‘मोरया‘ च्या गजरात बाप्पाला निरोप : सव्वाचारशे मुर्तींचे विसर्जन

‘मोरया‘ च्या गजरात बाप्पाला निरोप : सव्वाचारशे मुर्तींचे विसर्जन

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्तातच आज कोल्हापूरकरांनी ‘मोरया‘च्या गजरात बाप्पाला निरोप दिला. सायंकाळी साडेपाचपर्यंत इराणी खणीवर सव्वाचारशे मंडळांच्या मुर्ती विसर्जित झाल्या. इराणी खणीतच विसर्जन असल्याने महाव्दार रोड हा मुख्य मिरवणूक मार्ग पूर्णपणे वाहतूकीस बंद करण्यात आला होता. पर्यांयी मार्गाने मंडळे इराणी खणीकडे आली. मोजक्याच कार्यकर्त्यांना खणीवर प्रवेश देण्यात आला. या ठिकाणी गर्दी दिसताच पोलिसांनी प्रसंगी बळाचा वापर करत गर्दी हटवली.

दरम्यान, लेझीम, ढोलताशांचा गजर आणि विविधरंगी फुलांच्या पायघड्या अशा माहौलात गल्लीतच काही पावलं प्रतिकात्मक मिरवणूक काढून पर्यावरणपूरक पध्दतीने काही मंडळांनी मुर्तीचे विसर्जन केले. मंगळवार पेठेतील मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीचे सकाळी दहाच्या सुमारास गल्लीतच पर्यावरणपूरक पध्दतीने विसर्जन झाले. पालकमंत्री सतेज पाटील, आमराद चंद्रकांत जाधव, आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत मुर्तीचे विसर्जन झाले. एकीकडे विसर्जनासाठी मुर्ती बाहेर पडत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी तरूण मंडळाचा २१ फूटी महागणपतीची मुर्ती चौकात आणल्याची माहिती सोशल मीडियावरून बघता बघता शहरात पसरली आणि येथील गर्दी वाढू लागली. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना तत्काळ मुर्ती विसर्जनासाठी नेण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानुसार मुर्ती विसर्जनासाठी इराणी खणीकडे मार्गस्थ झाली.

इराणी खणीवर सकाळी बाराच्या सुमारास पहिली मुर्ती विसर्जनासाठी आली. त्यानंतर दुपारी अडीचपर्यंत २४२ सार्वजनिक मंडळांच्या मुर्तींचे विसर्जन झाले. साडेचारपर्यंत हा आकडा पाऊणेचारशे तर साडेपाचपर्यंत सव्वाचारशेपर्यंत गेला. साडेपाचपर्यंत या ठिकाणी एकूण ५७० घरगुती मुर्तींचेही विसर्जन झाले. सहानंतर मात्र येथे विसर्जनासाठी मोठ्या संख्येने मुर्ती आल्या आणि गर्दी वाढू लागली. एकाच ठिकाणी अधिक गर्दी दिसताच पोलिसांनी बळाचा वापर करून ही गर्दी हटवण्यावर भर दिला. त्याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वारंवार सूचना दिल्या जात होत्या. दरम्यान, इराणी खण, महाव्दार रोडसह या परिसराला जोडणाऱ्या सर्व मार्गावरील प्रमुख चौकांना पोलिस छावणीचे स्वरूप आले.

अनुचित प्रकार नाही

सायंकाळी साडेपाचपर्यंत विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यासाठी विशेष आपत्कालीन यंत्रणा कार्यरत होती. मंडळांनी लवकरात लवकर इराणी खणीवर पोचावे, यासाठी मार्गावरील पोलिसांकडून वारंवार सुचना देण्यात येत होत्या.

‘मोरया‘ च्या गजरात बाप्पाला निरोप : सव्वाचारशे मुर्तींचे विसर्जन
बाप्पाच्या निरोपासाठी राजेशाही गाडीतून मिरवणूक; 378 मंडळाच्या मूर्ती विर्सजित

अंबाबाईचा मानाचा गणपती

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्‍या मानाच्या गणपतीची मुर्ती सकाळी अकराच्या सुमारास महाव्दारात आणण्यात आली. तेथे दर्शनासाठीही गर्दी झाली. पण, अधिक गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत होती. रात्री आठच्या सुमारास महाव्दारातून ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळेपर्यंत मोजकेच कार्यकर्ते मुर्ती घेवून जातील आणि तेथे फुलांनी सजवलेल्या विसर्जन कुंडात मुर्तीचे पर्यावरणपूरक पध्दतीने विसर्जन होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com