
Ganesh Chaturthi: बदलापूरच्या नावाची आख्यायिका अन् तिथल्या महागणपतीचा इतिहास
गणेशोत्सवाच आणि बदलापूरच मुंबईच्या पूर्वेकडील उपनगराचं फार जुनं नातं आहे. येथील मूळच्या ‘बदलापूर गावी’तील जुने ‘महागणपती मंदिर’ ही या उपनगराची विशेष ओळख. बदलापूर पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर बदलपूर गावाच्या मधोमध हे मंदिर असून ते जवळपास तीनशे ते साडे-तीनशे वर्षे जुने असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मात्र, मंदिराच्या स्थापनेची माहिती उपलब्ध नाही. तरीही या मंदिराच्या स्थापनेनंतरच बदलापूरात सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमांची सुरूवात झाल्याचे शहराच्या इतिहासावर नजर टाकल्यावर दिसून येते.
बदलापूर गावात शिवाजी महाराज घोडे बदलायचे ही आख्यायिका असल्याने अनेकांच्या कुतूहलाचा विषय हे गाव ठरले. परंतु तिच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह आहे. परंतु याच आख्यायिकेतून येथील महागणपती मंदिराच्या निर्मितीमागची काही कारणे पुढे आली. बदलापूर गावात पूर्वी घोडय़ांच्या पागा होत्या व तेथूनच हे घोडे बदलले जात. शिवकाळात साधारण 1670 च्या सुमारास पेशवे बाळाजी विश्वनाथ असेच घोडे बदलण्यासाठी आले असता त्यांनी बदलापूर गावाला भेट दिल्यानंतर येथे गणपतीचे मंदिर बांधण्याचे सूचवल्याचे तेथील जुने ग्रामस्थ सांगतात. त्यावेळी पेशव्यांकडून मंदिरास दिवा-बत्तीला दोन होन व तीर्थ प्रसादासह अध्यात्मिक कार्यक्रमांसाठी मंदिरास सात एकर जमीन दिल्याची इतिहासात नोंद आहे.
सरकार दरबारी याचा उल्लेख असून देवस्थान समितीकडे त्याची तत्कालिन सनदही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ब्रिटीश सरकार कडूनही सांज-वातीकरिता 70 वर्षांपूर्वी सहा रूपये वर्षांसन मिळत असे. देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रकाश पांडे असे सांगतात. मंदिराची देखभाल व पूजा-अर्चा याकरीता पेशव्यांनी अलिबाग जवळील चरी गावातून भिक्षुक रघुनाथ लवाटे यांस आणले त्यांची दहावी पिढी आजतागायत गावात आहे.
पूर्वी हे देऊळ लाकडी बांधणीचे सर्वसामान्य कोकणी घरासारखे बांधले होते. मंदिर कौलारू व पूर्वाभिमुख, समोर दीपमाळ व दर्शनी दरवाजासह आणि तिन्ही बाजूंनी मंदिराच्या दक्षिणोत्तर भागांना जोडणारा कट्टा येथे होता. तसेच मंदिराच्या दर्शनी भागास विटांच्या लोखंडी गजांच्या मोठ्या चौकटी होत्या. त्यामुळे रस्त्यावरूनच दर्शन होत असे.
मंदिरात प्रवेश करताच एक मोठी पंचधातूची घंटा होती. गाभाऱ्याचे जोते चिरेबंदी तर विटांच्या मजबूत िभती होत्या. गाभाऱ्यात दोन-अडीच फूट उंचीची गणपतीची जुनी मूर्ती आहे. ही मूर्ती भीमाशंकर येथून पालखीतून बदलापूर गावात आणल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मंदिराच्या नूतनीकरणापूर्वी देवस्थानाच्या उत्तरेकडील बाजूस प. पू. रामकृष्ण परमहंस स्वामींची संजिवन समाधी होती. १९१६ त्यांनी ही समाधी घेतली असून ही समाधी सध्या नव्याने उभारलेल्या गणेश मंदिरात सामावलेली आहे.