US Election : निकाल काहीही लागो; अमेरिकेत भारतीय वंशाच्या उमेदवारांचीच बाजी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

अमेरिकेतील राज्य स्तरावरील निवडणुकीत भारतीय वंशाच्या अनेक उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ही संपूर्ण जगासाठीच महत्त्वपूर्ण निवडणूक मानली जाते. या निवडणुकीत रिपब्लिक पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांचे तगडे आव्हान आहे. अद्याप निकाल जाहीर झाला नसला तरीही जो बायडेन यांची आघाडी स्पष्टपणे दिसून येत आहे. या निवडणुकीत कुणीही बाजी मारो मात्र, यंदाची ही निवडणूक भारतीय लोकांसाठी आनंददायी ठरली आहे. कारण यंदाच्या या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या अनेक उमेदवारांनी बाजी मारली आहे. 

अमेरिकेतील राज्य स्तरावरील निवडणुकीत भारतीय वंशाच्या अनेक उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे. जवळपास 12 उमेदवार हे भारतीय वंशाचे असून त्यापैकी पाच या महिला आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीय वंशाचे लोक निवडून येणं ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. या राज्य स्तरीय निवडणुकीशिवाय भारतीय वंशाचे आणखी चार नागरिक हे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह पदासाठी निवडले गेले आहेत. यामध्ये एमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती यांचा समावेश आहे. 

हेही वाचा - US Election: बायडन यांनी मोडले ओबामांपासून ते क्लिंटनपर्यंतचे सर्व विक्रम
याशिवाय इतर समुदायांतील कमीतकमी तीन लोक असे आहेत जे अजूनही विजय प्राप्त करु शकतात. यातील एक उमेदवार हे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हच्या शर्यतीत आहेत. राज्याच्या निवडणुकीत विजय प्राप्त करणाऱ्या पाच महिलांमधील जेनिफर राजकुमार या न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीसाठी निवडल्या गेल्या आहेत तर नीमा कुलकर्मई या केंटुकी स्टेट हाऊस, केशा राम या वरमॉन्ट स्टेट सीनेट, वंदना स्लॅटर वॉशिंग्टन स्टेट हाऊस आणि पद्मा कुप्पा मिशिगन स्टेट हाऊससाठी निवडल्या गेल्या आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक निवडून येणं हे अमेरिकेच्या सत्ताकारणात आपल्या वाढत्या प्रभावाला निर्विवादपणे दाखवून देतात. 

अमेरिकेत जवळपास 40 लाख भारतीय वंशाचे लोक
अमेरिकेत जवळपास 40 लाख भारतीय वंशाचे लोक राहतात. यापैकी 25 लाख लोक हे मतदानासाठी पात्र आहेत. हे सारे लोक अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांत राहतात. राष्ट्राध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत रिपब्लिकन तसेच डेमोक्रॅटीक उमेदवारांच्या दरम्यान लढत होत असताना भारतीयांचे मत हे निर्णायक ठरत आहेत. यामुळेच अमेरिकेत भारतीय मतदारांवर प्रभाव पाडण्याचा सतत प्रयत्न केला जातो. असं म्हटलं जातं की, 13 लाखाहून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिक हे टेक्सास, फ्लोरिडा, मिशिगन ाणि पेंसिलवेनिया सारख्या राज्यात राहतात. 

हेही वाचा - खुशखबर : ऑक्सफर्ड लशीचे निष्कर्ष पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता; लवकरच लस बाजारात

अमेरिकेची ही निवडणूक आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेली असताना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचलेले असताना ट्रम्प यांनी या निवडणुकीविरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. हे वाद शिगेला पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 indian americans win state level elections in united states of America presidential election 2020