खुशखबर : ऑक्सफर्ड लशीचे निष्कर्ष पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता; लवकरच लस बाजारात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

भारतातही या लशीच्या उत्पादनाची जबाबदारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने घेतली आहे.

कोरोनाचा हाहाकार सध्या सगळ्या जगात दिसून येतोय. अद्याप कोरोनाशी असलेली ही लढाई संपुष्टात आलेली नसून काही देशांत कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन देखील या देशांमध्ये लावण्यात आला आहे. जवळपास 1.2 दशलक्ष लोक या कोरोनामुळे जगभरात मृत्यूमुखी पडलेले आहेत. कोरोनाच्या या संकटामुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या आहेत शिवाय अनेक आयुष्य पणाला देखील लागलेली आहेत. या कोरोनाविरोधात प्रभावी ठरेल अशी लस शोधण्याचे प्रयत्न  संपूर्ण जगभरात सुरु असून ऑक्सफर्ड लस यामध्ये प्रभावी मानली जात आहे. लसनिर्मितीच्या घोडदौडीमध्ये ही लस आघाडीवर आहे. 

हेही वाचा - दिलासादायक! हॉस्पिटलमध्ये दाखल न केलेल्यांच्या शरीरात आपोआप तयार होतेय सेल्युलर इम्युनिटी

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे तयार केल्या जाणाऱ्या लशीचे तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील ट्रायलचे निष्कर्ष याच वर्षी येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. जर असं झालं तर ब्रिटनमध्ये या वर्षाच्या अखेरिस अथवा नव्या 2021 वर्षाच्या सुरवातीला लशीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. 

ऑक्सफर्ड लशीच्या ट्रायलचे प्रमुख संशोधक एँड्र्यू पोलार्ड यांनी म्हटलंय की, मी आशावादी आहे की आम्ही या वर्षीच्या अखेरीच्या आधीच एक प्रभावी लस निश्चितपणे आणू शकू.त्यांनी पुढे म्हटलंय की, या लशीच्या ट्रायलमधील निष्कर्षांचा आम्ही काळजीपूर्वक अभ्यास करत आहोत. या वर्षीच्या अखेरीस लस येईलही पण अंतिमत: त्याला परवानगी देण्याचे नियामकांच्या हातात आहे तसेच हा एक राजकीय निर्णय देखील आहे. 

हेही वाचा - US Election: बायडन यांनी मोडले ओबामांपासून ते क्लिंटनपर्यंतचे सर्व विक्रम
आम्ही प्रभावी लशीच्या निश्चितच अगदी जवळ आहोत पण अद्याप काम संपलेले नाहीये, असंही पोलार्ड यांनी सांगितलं.  ख्रिसमसच्या आधी लस येईल का या प्रश्नावर ते म्हणाले की, याच्या अगदी कमी शक्यता आहेत, मी याबाबत खात्रीने काही सांगू शकत नाही. 
ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनेकाने  बनवलेली ही लस सर्वांत पहिली यशस्वी लस बनण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्डच्या लशीच्या निर्मितीची प्रक्रिया ही जानेवारीमध्येच सुरु झालेली होती. या लशीला AZD1222 किंवा ChAdOx1 nCoV-19 नावाने ओळखले जाते. 

भारतातही या लशीच्या ट्रायल सुरु आहेत. तसेच या लशीच्या उत्पादनाची जबाबदारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने घेतली आहे. भारतात सीरमसोबत ऑक्सफर्डच्या एस्ट्राझेनेका लशीची निर्मिती सुरु आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oxford vaccine could get result of third trial very soon raising hopes 2021 to rollout