#GatesFoundation : राजस्थानची पायल ठरली पहिली 'चेंजमेकर' भारतीय!

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

राजस्थानमध्ये राहणाऱ्या पायलचा विवाह लहानपणीच करण्याची तिच्या कुटुंबाची इच्छा होती, पण पायलने घरातील लोकांचा विरोध पत्करत विवाह करण्यास नकार दिला.

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच बिल व मेलिंडा फाउंडेशनने भारतातील पायल जांगिड (वय 17) या युवतीला 'चेंजमेकर' पुरस्काराने गौरविण्यात आले.

राजस्थानमध्ये बाल कामगार आणि बालविवाहाविरोधात चळवळ उभारल्याबद्दल पायलला हा पुरस्कार देण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या उपसरचिटणीस अमिना जे. मुहंमद यांच्या हस्ते तिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेंजमेकर पुरस्कार मिळविणारी पायल ही पहिली भारतीय ठरली आहे. 

पंतप्रधानाबरोबर आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत असल्याचे पायलने या वेळी सांगितले. राजस्थानमधून बाल कामगार आणि बालविवाह हद्दपार करण्यासाठी ज्या प्रमाणे आपण राजस्थानमध्ये चळवळ उभारली तशीच चळवळ जगभरात उभारण्याची इच्छा असल्याचे ती म्हणाली. 

राजस्थानमध्ये राहणाऱ्या पायलचा विवाह लहानपणीच करण्याची तिच्या कुटुंबाची इच्छा होती, पण पायलने घरातील लोकांचा विरोध पत्करत विवाह करण्यास नकार दिला. तेव्हापासून बालकांच्या अधिकारांसाठी संघर्ष करणारी मुलगी, म्हणून तिला ओळखळे जाऊ लागले. पायलने आपल्याजवळील गावांमध्येही जाऊन बालविवाह रोखले आहेत. 

आपल्या सर्वांना अभिमान वाटावे, असे काम पायलने केले आहे. पायल ही भारत आणि जगभरात बालशोषणाविरोधातील संघर्षासाठी कायम आघाडीवर राहणारी मुलगी आहे. 
- कैलास सत्यार्थी, नोबेल पुरस्कारविजेते सामाजिक कार्यकर्ते

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

-  तोंडी तलाक पीडितांना सरकारकडून 6 हजार रुपये

- पवारांवर गुन्हा दाखल झाला तसा मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करा- शेट्टी

- Mangalyaan : सहा महिन्यांसाठी पाठवलेल्या 'मॉम'ने केला 5 वर्षांचा प्रवास पूर्ण!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 years old Indian girl Payal Jangid received the Changemaker Award from Gates Foundation