Nobel Prize 2019 : लिथीयम आयन बॅटरीच्या संशोधकांना रसायनशास्त्रातील नोबेल!

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

'युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍सास'मधील जॉन.बी. गुडइनफ, बिंघमटन येथील 'स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क'मधील एम. स्टॅन्ली व्हिटिंगहम आणि जपानमधील असाही कसेई कार्पोरेशन आणि मेईजो विद्यापीठातील अकिरा योशिनो यांना विभागून हा सन्मान जाहीर झाला आहे. 

स्टॉकहोम : लिथीयम-आयन बॅटरीच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या तीन संशोधकांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या बॅटरीच्या निर्मितीमुळे ऊर्जा संकलनाला एक नवा आयाम मिळाला. तसेच कार, मोबाईल फोन आणि अन्य उपकरणांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. यामुळे उपकरणांची पोर्टेबलिटी आणखी वाढल्याचे पुरस्कार समितीने म्हटले आहे. 

'युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍सास'मधील जॉन.बी. गुडइनफ, बिंघमटन येथील 'स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क'मधील एम. स्टॅन्ली व्हिटिंगहम आणि जपानमधील असाही कसेई कार्पोरेशन आणि मेईजो विद्यापीठातील अकिरा योशिनो यांना विभागून हा सन्मान जाहीर झाला आहे. 

'रॉयल स्विडीश अकॅडमी ऑफ सायन्स'चे सरचिटणीस गोरान हानसून यांनी आज या पुरस्कारांशी घोषणा करताना हे सन्मान रिचार्जेबल जगाबाबतचे आहेत, अशी घोषणा केली.

पुरस्कार समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ''लिथीयम आयन बॅटरीमुळे मानवी जीवनामध्ये क्रांती झाली असून पुरस्कार विजेत्यांनी वायरलेस आणि इंधनरहित समाजाचा पाया घातला आहे.'' लिथीयम आयन बॅटरीचे मूळ हे 1970 च्या दशकातील तेल संघर्षामध्ये दडलेले आहे. व्हिटींघम त्याचवेळी इंधनरहित तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रयत्न करत होते, असेही पुरस्कार समितीने तिच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. स्टॉकहोममध्ये 10 डिसेंबर रोजीच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

तीन शास्त्रज्ञांचे योगदान

व्हिटिंगहम यांनी लिथीयम धातूमधील ऊर्जा शोधली, वजनाला हलका असणारा हा धातू पाण्यावर तरंगू शकतो. इलेक्‍ट्रॉनच्या नैसर्गिक गुणधर्मांचा वापर करून लिथीयमच्या सहाय्याने ऊर्जा निर्मिती करण्यात व्हिंटिंगहम यांना यश आले होते. या बॅटरीचा अर्धाभाग त्यांनी तयार केला होता, पण त्यांनी तयार केलेली बॅटरी ही वापरण्यासाठी तितकीशी मजबूत नव्हती.

पुढे गूडइनफ यांनी व्हिटिंगहम यांच्याच प्रतिकृतीचा वापर केला आणि यासाठी धातूमधील वेगळ्या घटकाचा वापर केला. यामुळे बॅटरीची ऊर्जानिर्मितीची क्षमता दुप्पट होऊन ती चार व्होल्ट्‌सने वाढली. यामुळे शक्तिशाली आणि टिकाऊ बॅटरीच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला.

योशिनो यांनी 1985 मध्ये लिथीयमचे आयन साठवून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या कार्बनवर आधारित घटकाचा शोध लावला होता. यामुळे लिथीयम बॅटरीचा व्यावसायिक वापर शक्‍य झाला. अशा प्रकारे तीन संशोधकांच्या योगदानातून आजची लिथीयम बॅटरी आकारास आली.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- INDvSA : ढगाळ हवामानातच होणार पुणे कसोटी!

- I Will Vote : चला, जागतेपणाने मतदान करू या...!

- ‘द फॅमिली मॅन’ मनोज वाजपेयी एकेकाळी करणार होता आत्महत्या!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2019 Nobel Prize in Chemistry awarded for work on Lithium ion batteries