esakal | ऑस्कर पुरस्कारांत ‘नोमॅडलँड’चा दबदबा
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar Award

ऑस्कर पुरस्कारांत ‘नोमॅडलँड’चा दबदबा

sakal_logo
By
पीटीआय

लॉस एंजेलिस - ९३ व्या ऑस्कर पुरस्कारावर नोमॅडलँड चित्रपटाचा दबदबा राहिला. नोमॅडलँड चित्रपटाने तीन ऑस्कर पटकावले असून सर्वोत्तम चित्रपटाबरोबरच सर्वोत्तम अभिनेत्री आणि दिग्दर्शनासाठीच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. अँथनी हॉपकिन्स यास ‘द फादर’ चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

जानेवारी २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना ऑस्कर पुरस्कारात स्थान मिळाले. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटर आणि युनियन स्टेशनमध्ये करण्यात आले होते. नोमॅडलँडच्या दिग्दर्शिका क्लोई चाओ यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्तम दिग्दर्शनाचा मान मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिल्या ठरल्या आहेत. त्याचवेळी हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या आशियायी महिल्या ठरल्या.

‘मिनारी’ चित्रपटातील नायिका ७३ वर्षीय यूह ज्युंग यून यांना सर्वोत्तम सहायक अभिनेत्री श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या कोरियन नायिका ठरल्या आहेत. सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार ‘द फादर’साठी ॲथनी हॉपकिन्स याला तर डॅनियल क्लुयूयाला ‘ज्युडास अँड द ब्लॅक मेसिह’साठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्तम ॲनिमेटेड फीचर फिल्मचा पुरस्कार ‘सोल’ला मिळाला. या चित्रपटाने सर्वोत्तम पार्श्वसंगीतासाठीचाही पुरस्कार पटकावला.

हेही वाचा: थायलंडच्या पंतप्रधानांना मास्क न घातल्याने दंड

आठवण इरफान खान, भानू अथय्यांची

भारतीय अभिनेता इरफान खान आणि वेशभूषाकार भानू अथय्या यांच्या स्मृतींना ऑस्कर सोहळ्यात उजाळा देण्यात आला. त्यांचा स्मृती श्रेणीत गौरव करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोहळ्यात तीन मिनिटाच्या ‘इन मेमोरियन’च्या (फोटोंचे कोलाज) माध्यमातून गेल्यावर्षी निधन पावलेल्या दिग्गज कलाकारांना आदरांजली वाहण्यात आली. इरफान खान आणि भानू अथय्या यांच्याशिवाय चॅडविक बोसमन, बाँडपटाचा नायक शॉन कॉनरी, ख्रिस्तोफर प्लमर, ऑलिव्हिया डे हॅविलँड, किर्क डग्लस, जॉर्ज सेगल आदी कलाकारांचे स्मरण करण्यात आले. इरफान खान (वय ५४) यांचे गेल्यावर्षी २८ एप्रिल रोजी कर्करोगाने निधन झाले तर, अथय्या यांना मेंदूचा कर्करोग होता आणि ९१ व्या वर्षी त्यांचे १५ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी निधन झाले.

फ्रान्सेस मॅक्डरमंडचे तिसरे ऑस्कर

अमेरिकन अभिनेत्री फ्रान्सेस मॅक्डरमंडचे हे तिसरे ऑस्कर आहे. यापूर्वी तिला फर्गो (१९९७) आणि थ्री बिलबर्डस आउटसाइड इबिंग मिसुरी (२०१८) साठी ऑस्कर मिळाले होते. अभिनेत्री कॅथरिन हेपबर्नने चार वेळा ऑस्करवर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे फ्रान्सिस आता त्यापासून एकच पुरस्कार दूर आहेत. नोमॅडलँडचे कथानक जेसिका ब्रुडेरच्या नोमॅडलॅड : सर्व्हाव्हिंग अमेरिका इन व्टेंटी फर्स्ट सेंचुरी या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन क्लोई चाओ यांनी केले आहे.

हेही वाचा: कोरोना संकटात गुगल-मायक्रोसॉफ्ट भारताला करणार मदत

ऑस्करचे मानकरी

 • सर्वोत्तम चित्रपट : नोमॅडलँड

 • अभिनेता : अँथनी हॉपकिन्स (द फादर)

 • अभिनेत्री : फ्रान्सेस मॅक्डोरमंड (नोमॅडलँड)

 • दिग्दर्शन : क्लोई चाओ (नोमॅडलँड)

 • सहायक अभिनेत्री : यूह ज्युंग यून (मिनारी)

 • सहायक अभिनेता : डॅनियल क्लुयूया (ज्युडास ॲड द ब्लॅक मेसिह)

 • आंतरराष्ट्रीय चित्रपट : अनदर राउंड

 • ॲनिमेटेड चित्रपट : सोल

 • गीत : फाइट फॉर यू

 • चित्रपट संपादन : साउंड ऑफ मेंटल

 • ॲडॉप्टेड स्क्रिन प्ले : द फादर

 • छायाचित्रण : मंक

 • बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन : मंक

 • व्हिज्युअल इफेक्टस : टेनेट

 • वेशभूषाकार : ब्लॅक बॉटम

 • केशरचना, रंगभूषा : ब्लॅक बॉटम

 • माहितीपट : माय ऑक्टोपस टिचर

 • पार्श्वसंगीत : सोल

 • मूळ पटकथा : प्रॉमिसिंग यंग वूमन

 • ध्वनिमुद्रण : साउंड ऑफ मेटल

 • लाइव्ह ॲक्शन शॉर्ट्स : टू डिस्टंट स्ट्रेंजर्स

 • ॲनिमेटेड शॉर्ट्स : इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू

 • डॉक्यूमेंट्री शॉट्स : कोलेट्टे

loading image