esakal | बांगलादेशात कारखान्यात लागलेल्या आगीत ५२ जणांचा मृत्यू, 40 बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

बांगलादेशात कारखान्यात लागलेल्या आगीत ५२ जणांचा मृत्यू, 40 बेपत्ता

बांगलादेशात कारखान्यात लागलेल्या आगीत ५२ जणांचा मृत्यू, 40 बेपत्ता

sakal_logo
By
विनायक होगाडे

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाक्यात गुरुवारी एका कारखान्याला लागलेल्या आगीत ५२ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जखमी झाले. अजूनही ४० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी जळत्या इमारतीतून उड्या मारल्या आणि त्यात काहींचा जीव गेला. सहा मजली इमारतीच्या खालच्या मजल्याला आग लागली आणि ती वरच्या मजल्यापर्यंत पसरली, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. रासायनिक पदार्थ आणि प्लॅस्टिकमुळे आग वेगात पसरल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा: समान नागरी कायद्याची देशाला गरज; हायकोर्टाने दिले केंद्राला निर्देश

नारायणगंजच्या रुपगंज येथील शेजन ज्यूस कारखान्यात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. आग एवढी भीषण होती की शुक्रवार दुपारपर्यंत ती विझलेली नव्हती. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोचले आणि त्यांनी इमारतीत अडकलेल्या २५ जणांना वाचवले. आतापर्यंत एकूण किती जणांचा मृत्यू झाला, हे सांगता येणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. आग नियंत्रणात आल्यावरच सर्वकाही स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. भीषण आगीत अनेक जण भाजले असून काही जणांनी उड्या मारल्यामुळे जखमी झाले. एका जखमी मजुराने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत आग पसरली तेव्हा जिन्याच्या दोन्ही बाजूचे दरवाजे बंद होते. त्यावेळी त्या मजल्यावर ४८ जण होते. त्यांचे काय झाले असेल, हे सांगू शकत नाही, असे तो म्हणाला.

हेही वाचा: भयानक! बक्षीस दिलं नाही, मुंबईत तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या बाळाची केली हत्या

आगीच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १८ बंबांना पाचारण करण्यात आले होते. अजूनही ४४ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने मजुरांना बाहेर पडता आले नाही, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या इमारतीत सुरक्षेचे कोणतेच नियम पाळले गेले नसल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी नारायणगंज जिल्हा प्रशासनाने पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

loading image