भयंकर! हिटलरच्या नाझी सैन्याने 2 दिवसात घेतला होता 45 हजार लोकांचा बळी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 4 November 2020

1943 मध्ये दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान हिटलरच्या नाझी पक्षाकडून भयंकर नरसंहार करण्यात आला होता

1933 ते 1945 दरम्यान जर्मनीचा हुकूमशाहा हिटलरच्या नाझी जर्मन पार्टीने जवळपास 44,000 कॅम्प्सचे निर्माण केले होते. या कॅम्प्सचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जाईचा. या कॅम्पमध्ये जर्मनीचे शत्रू समजले जाणाऱ्या लोकांना ठेवले जायचे. एकाचवेळी हजारो लोकांचा बळी घेण्यासाठी या कॅम्पचा प्रामुख्याने वापर केला गेला.  

1943 मध्ये दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान हिटलरच्या नाझी पक्षाकडून भयंकर नरसंहार करण्यात आला होता. 3 आणि 4 नोव्हेंबर 1943 मध्ये ऑपरेशन हारवेस्ट फेस्टिवलमध्ये माज्देनेक, पोन्तातोवा आणि त्राव्निकी कॅम्पातील जवळपास 40 ते 45 हजार ज्यू लोकांची हिटलरच्या नाझी सैनेने हत्या केली होती. 

दुसऱ्या महायुद्धात नाझी पार्टीचा कमांडर हेनरिक हिमलरने जर्मनीच्या ताब्यात असणाऱ्या पोलंडच्या लुबलिन क्षेत्रात असणाऱ्या ज्यू लोकांना मारण्याचा आदेश दिला होता. 1943 च्या ऑक्टोबरमध्ये ज्यू लोकांनी उठाव केला होता, त्यामुळेही हिमलरने हा निर्णय घेतला होता. 

US election: 'गाढव' की 'हत्ती' कोण मारणार बाजी? जाणून घ्या...

लुबलिनमध्ये हजारो पोलिस आणि नाझी सैनिक 2 नोव्हेंबर रोजी आले होते. यादिवशी ऑपरेशनची योजना बनवण्यात आली. नाझी सैनिकांनी सर्वात आधी माज्देनेक कॅम्पातील ज्यूंचा खात्मा सुरु केला. ज्यू कैद्यांना दुसऱ्या कैद्यांपासून वेगळे करण्यात आले होते. एका दिवसात 18,400 ज्यू लोकांना गोळ्या मारण्यात आली होती. त्राव्निकी कॅम्पमध्ये 6000 लोकांना मारण्यात आले होते. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी पोन्यातोवा कॅम्पमधील 14,500 ज्यूंना गोळ्या मारण्यात आल्या होत्या.

या सर्व कॅम्पमध्ये ज्यू लोकांना निर्वस्त्र करण्यात आले होते. शिवाय जोराचे म्युझिक लावण्यात आले होते, जेणेकरुन गोळ्यांचा आवाज आणि कैद्यांच्या चिरकण्याचा आवाज येणार नाही. या ऑपरेशननंतर कसेतरी 10 हजार ज्यू लोकांचा जीव वाचला होता. शवांची विल्हेवाट लावण्यास मदत व्हावी यासाठी काही ज्यू लोकांना नाझी सैनेने सोडले होते. 2 दिवसात 45 हजार लोकांना मारण्यात आल्याने ऑपरेशन हारवेस्ट फेस्टिवलला हिटलरच्या सैनेचे सर्वात भयंकर ऑपरेशन म्हटले जाते. माज्देनेकमध्ये 3 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. 

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adolf hitler german nazi party killed forty thousand people in operation harvest