esakal | काबूलमध्ये ‘गो बॅक पाकिस्तान’
sakal

बोलून बातमी शोधा

afghanistan

काबूलमध्ये ‘गो बॅक पाकिस्तान’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल : पंजशीरच्या युद्धात पाकिस्तानने तालिबानला मदत केल्याने अफगाणिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन होत असून काबूल येथे आज महिलांनी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांना पांगविण्यासाठी तालिबानच्या दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे.

पंजशीरच्या युद्धात पाकिस्तानने हस्तक्षेप केल्याने अफगाणिस्तानच्या नागरिकांत पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. या आंदोलनात ‘गो बॅक पाकिस्तान’ ‘स्वातंत्र्य स्वातंत्र्य हवे’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर आंदोलन सुरू असताना त्यांना हुसकावून लावण्यासाठी तालिबानने हवेत गोळीबार केला.

हेही वाचा: 'पाकिस्तान मुर्दाबाद' घोषणा देणाऱ्यांवर तालिबानकडून गोळीबार

या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे पळापळ होऊन काही महिला जखमी झाल्या. काल रात्री देखील काबूलमध्ये महिलांनी पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन केले. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. तालिबानचे अत्याचार आणि पाकिस्तानची घुसखोरी यामुळे अफगाणिस्तानच्या नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे.

वास्तविक गेल्या अनेक दिवसांपासून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या शहरात महिलांकडून आंदोलन केले जात आहे. परंतु काबूलमध्ये आंदोलन होण्याची पहिलीच वेळ आहे. असवाका न्यूज संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काबूल येथे अध्यक्षीय भवनाजवळ सेरेना हॉटेल असून या ठिकाणी गेल्या आठवड्यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे प्रमुख फैज हमीद हे थांबले होते. या हॉटेलकडे आंदोलनकर्ते जात असताना तालिबानने त्यांना हुसकावून लावले.

हेही वाचा: हरियाणामध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पुन्हा पाण्याचे फवारे

पंजशीरमध्ये पाकचे हवाई हल्ले

तालिबानने पंजशीरचे युद्ध जिंकून अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळविल्याचा दावा केला आहे. तालिबानने या कामी पाकिस्तानची मदत घेतली आहे.

रेझिस्टन्स फोर्सचे नेतृत्व करणाऱ्या अहमद मसूद यांनी देखील पाकिस्तानच्या हवाई दलाकडून बॉम्बवर्षाव केला जात असल्याचे सांगितले. यामुळे तालिबानला मदत मिळत आहे. आता आमची खरी लढाई पाकिस्तानशी आहे. कारण पाकिस्तान सैनिक आणि आयएसआयने या संघर्षात तालिबानकडून नेतृत्व केले आहे, असे मसूद म्हणाला.

तालिबानला पाकिस्तानचे सहकार्य

पंजशीरपूर्वीही पाकिस्तानने तालिबानला अनेकदा मदत केली आहे. अनेक अमेरिकी सैनिक अधिकाऱ्यांनी देखील तालिबानच्या मागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा सामील असल्याचा दावा केला. अर्थात पाकिस्तानने हे आरोप फेटाळले. पण काही दिवसांपूर्वीच आयएसआयचे प्रमुख काबूलला येऊन गेले आणि त्यांनी सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली.

loading image
go to top