esakal | मी पळून गेलो नाही, पंजशीर तालिबानच्या ताब्यात गेल्याची अफवा - अमरुल्ला सालेह
sakal

बोलून बातमी शोधा

पंजशीरवर तालाबिनाचा ताबा नाहीच; अमरुल्ला सालेह यांचा VIDEO समोर

रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं होतं की, तालिबानने पूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे.

पंजशीरवर तालाबिनाचा ताबा नाहीच; अमरुल्ला सालेह यांचा VIDEO समोर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काबूल - अफगाणिस्तानमध्ये आता पंजशीरसुद्धा ताब्यात घेतल्याचा दावा तालिबानने शुक्रवारी केला. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. त्यात म्हटलं आहे की, आता पंजशीरसुद्धा तालिबानच्या ताब्यात गेलं आहे. एवढंच नाही तर स्वत:ला अफगाणिस्तानचा राष्ट्रपती घोषित केलेले अमरुल्ला सालेहसुद्धा पंजशीरमधून पळून गेले आहेत. दरम्यान, आता तालिबानला आव्हान देणारे अमरुल्ला सालेह यांनी एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. त्यात सालेह यांनी म्हटलं आहे की, मी देश सोडून पळालो नाहीय. पंजशीरच्या खोऱ्यातच आहे आणि रेजिस्टंट फोर्सच्या कमांडर्स आणि राजकीय नेत्यांसोबत आहे.

अमरुल्ला सालेह यांनी तालिबानने ताबा मिळवल्याची चर्चा फेटाळून लावली आहे. तसंच म्हटलं की, पंजशीर खोऱ्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालिबान आणि इतर संघटनांकडून हल्ले केले जात आहेत. मात्र त्यांना कोणत्याही भागावर ताबा मिळवता आलेला नाही. काही माध्यमांनी असेही वृत्त दिले की, मी देशातून पळून गेलो. पण हे वृत्त तथ्यहीन आहे. हा माझा आवाज आहे आणि पंजशरी खोऱ्यातून कॉल करत आहे. मी आपल्या कमांडर्स आणि राजकीय नेत्यांसोबत इथेच आहे.

हेही वाचा: काबूल: निधीसाठी तालिबानची मदार चीनवर

तालिबानच्या हल्ल्याबद्दल बोलताना अमरुल्ला सालेह यांनी सांगितलं की, आम्ही परिस्थितीची माहिती घेत आहे. नक्कीच हा कठीण काळ आहे. तालिबान, पाकिस्तानी आणि अलकायदासह इतर दहशतवादी आक्रमण करत आहेत. आमच्या भागावर आमचा ताबा आहे आणि अजुनही आम्ही तो गमावलेला नाही. गेल्या चार पाच दिवसांपासून तालिबानने आक्रमण वाढवले आहे. मात्र अजुनही त्यांना यश मिळालेलं नाही. या हल्ल्यात काही त्यांचे आणि काही आमचे लोक मारले गेले आहेत.

व्हिडिओमध्ये सालेह यांनी सांगितलं की, या माध्यमातून मी तुम्हाला धीर देतो आणि स्पष्ट करतो की मी जखमी नाही आणि पळूनही गेलेलो नाही. अशा प्रकारच्या बातम्या निराधार आणि खोट्या आहेत. आमचा प्रतिकार सुरुच आहे आणि सुरु राहील. मी माझ्या देशाच्या संरक्षणासाठी आहे. आम्ही तालिबानसमोर कधीही शरणागती न पत्करण्याची शपथ घेतली आहे.

हेही वाचा: पंजशीरमध्ये लढाई, वयोवृद्धांचा 'माइन क्लियरन्स टुल' म्हणून वापर

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी तालिबानने काबुल ताब्यात घेण्याच्या एक दिवस आधी देशातून पळ काढला होता. तालिबानने काबुलवर १५ ऑगस्ट रोजी ताबा मिळवला. त्यानंतर अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती घोषित करत पंजशीरमधून लढा सुरु ठेवला आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं होतं की, तालिबानने पूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. जे लोक विरोध करत होते त्यांनाही तालिबानने पराभूत केलं आहे. आता पंजशीर तालिबानच्या ताब्यात आहे. मात्र रेजिस्टन्स लीडर्सनी तालिबानचा दावा फेटाळून लावत पंजशीरमधला लढा सुरुच असल्याचं सांगितलं होतं.

loading image
go to top