अमेरिकेनेसुद्धा TikTok सह चायनिज अ‍ॅपवर घातली बंदी; चीनने दिली प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

अमेरिकेने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता चिनी सोशल मीडिया अॅप टिकटॉक आणि वुई चॅटवर रविवारपासून बंदी घातली जाणार आहे. 

शांघाय - भारताने चायनिज अ‍ॅपवर घातेलल्या बंदीनंतर आता अमेरिकेनंसुद्धा अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. अमेरिकेने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता चिनी सोशल मीडिया अ‍ॅप टिकटॉक आणि वुई चॅटवर रविवारपासून बंदी घातली जाणार आहे. दरम्यान, यावर चीनने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, अमेरिका त्यांना त्रास देत आहे.  तसंच अमेरिकेनं धमकी देणं सोडावं, चुकीची कामे बंद करून प्रामाणिक आणि पारदर्शक आंतरराष्ट्रीय नियम आणि व्यवस्था कायम ठेवण्याची विनंतीसुद्धा चीनने केली आहे.

अमेरिकेनं बंदीच्या आदेशात म्हटलं होतं की, देशाची एकता आणि सुरक्षा यासाठी संबंधित अ‍ॅप धोकायदायक होती. चीनची मालकी असलेलं व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप टिकटॉक खरेदी करण्यासाठी ओरॅकल चर्चा करत आहे. पण त्यांना मंजुरी देण्याआधी देशाची सुरक्षा कोणत्याही प्रकारे धोक्यात येणार नाही याची खात्री करून घेतली जाईल असं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. 

हे वाचा - लडाखमध्ये चिनी सैनिक पडले आजारी; फिंगर 4 वरून न्यावे लागतायत रुग्णालयात

गेल्याच महिन्यात ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅटवर बंदी घालण्यासाठी एका आदेशावर सह्या केल्या होत्या. त्यानुसार चिनी कंपन्या त्यांचे मालकी हक्क कोणत्याही अमेरिकन कंपनीला विकून या बंदीतून वाचू शकतात. मंत्री विल्बर रॉस यांनी सांगितलं की, राष्ट्राध्यक्षांच्या आदेशावरून आम्ही अमेरिकन नागरिकांची माहिती गोळा करण्याच्या चीनच्या चुकीचा कामाला थांबवण्यासाठी आम्ही मोठी कारवाई केली आहे. यामुळे आम्ही राष्ट्रीय मुल्ये, लोकशाहीच्या नियमांवर आधारीत काही बाबी आक्रमकपणे अमेरिकन कायदे आणि नियमांच्या माध्यमातून लागू करू शकेन.

अमेरिकेत 20 सप्टेंबरपासून वुई चॅट आणि 12 नोव्हेंबरपासून टिकटॉक चालणार नाही. ज्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सुरु आहे त्यांतही कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कवर बंदी असेल त्यामुळे वापर करता येणार नाही. भारताने 29 जुलै रोजी टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे. याशिवाय त्यानंतर 244 इतर चायनिज अ‍ॅपवर बंदी घातली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america ban tiktok and we chat china says us annoying