अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचा उद्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

America Europe Corona Eruption

अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचा उद्रेक

ओमिक्रॉनमुळे युरोप आणि अमेरिकेची (Europe and America) स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या २४ तासांत अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, स्पेन आणि इटलीतील लाखो रुग्णांची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी कोरोनाची पाचवी लाट आली असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा विषाणूच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन (Omicron) या प्रकाराची सुनामी येण्याची शक्यता व्यक्त करून आरोग्य व्यवस्थेवर याचा मोठा ताण पडेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकताच दिला आहे. गेल्या आठवड्यात जागतिक पातळीवर कोरोना रुग्णांच्या प्रमाणात ११ टक्क्यांनी वाढले आहे.

हेही वाचा: मुंबईत कोरोनाचा उद्रेक; नव्या रुग्णांनी साडेपाच हजारांचा टप्पा गाठला!

फ्रान्समध्ये डेल्टापेक्षा ओमिक्रॉन हा सर्वाधिक संसर्गजन्य प्रकार ठरला आहे. देशातील आरोग्य संस्थेने याबाबत माहिती दिली. काही दिवसांपासून ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने फैलावला आहे. या आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्‍णांपैकी ओमिक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण ६२.४ टक्के आहे. गेल्या आठवड्यापेक्षा हे प्रमाण १५ टक्क्याने जास्त आहे, असे आरोग्‍य संस्थेने सांगितले.

स्पेनमध्ये २४ तासांत ७४ मृत्यू

स्पेनमध्ये गेल्या २४ तासांत एक लाख ६१ हजार ६८८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत तर ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना मृतांची एकूण संख्या सुमारे ८९ हजार ४०५वर पोहचली आहे. स्पेनच्या राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ६२ लाख ९४ हजार ७४५ नागरिकांना कोरोना झाला आहे. नव्या वर्षाच्या स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे संसर्ग जास्त फैलावण्याची भीती असल्याने सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

हेही वाचा: 'निष्काळजी राहू नका'; आरोग्य सचिवांचं जिल्हाधिकाऱ्यांना इशाऱ्याचं पत्र

चीनच्या शिआनमध्ये अकराशे रुग्ण

चीनमधील शांक्सी प्रांतातील शिआन शहरात कडक लॉकडाउन करूनही रुग्णसंख्या वाढतच आहे. देशातील सरकारी वृत्तपत्राच्या माहितीनुसार गुरुवारपर्यंत (ता.२९) येथ एक हजार ११७ रुग्ण होते. यातील बहुतेक जणांना स्थानिक पातळीवरील संसर्ग झाला आहे, ही चिंताजनक बाब आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हणजेच स्थानिक पातळीवर संक्रमण वेगाने पसरत आहे. शिआनची लोकसंख्या एक कोटी ३० लाख आहे. घरांमधील स्वयंपाकाचे साहित्य संपत असल्याची व्यथा येथील नागरिकांनी सोशल मीडियावर मांडली आहे, तर दुसरीकडे लोकांच्या घरांपर्यंत साहित्य पोचविले जात असल्याचा दावा सरकार करीत आहेत.

दक्षिण आफ्रिकेत स्थिती सुधारली

ओमिक्रॉनचा प्रसार सुरुवातील दक्षिण आफ्रिकेतून झाला असला तरी आता तेथे कोरोनाची चौथी लाट संपुष्टात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे देशातील रात्रीची संचारबंदी हटविण्यात आली आहे. तेथील निर्बंधांनुसार बंदिस्त कार्यक्रमात एक हजार आणि खुल्या कार्यक्रमांसाठी दोन हजार लोक सहभागी होऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागानुसार देशात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये २९.७ टक्के घट झाली आहे. आफ्रिकेत एकूण रुग्णसंख्या ३५ लाख असून ९१ हजार मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा: Apple कंपनीच्या व्यवसायाची चौकशी व्हावी; CCIचे आदेश

अमेरिकेत विमान वाहतुकीवर परिणाम

अमेरिकेत कोरोनासह ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा परिणाम विमान वाहतुकीवरही झाला आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या गुरुवारच्या (ता.३०) वृत्तानुसार अमेरिकेत सुमारे एक हजार विमान उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या नाताळाच्या सुट्या असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विमान कंपन्यांकडे सध्या कर्मचारी कमी आहे. खूप प्रयत्न करूनही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. कोरोनाशिवाय हिमवर्षाव आणि खराब हवामानामुळेही विमान सेवेवर परिणाम झाला आहे. आज ५०० उड्डाणे रद्द केल्याचा अंदाज आहे. अमेरिकेत ओमिक्रॉनची लागण झालेल्यांचे प्रमाण वाढत असल्याने एकूण कोरोना रुग्णांची संख्येतही भर पडत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top