सिरियल किलरचा तुरुंगात तडफडून मृत्यू; 93 महिलांचा केला होता खून

टीम ई सकाळ
Thursday, 31 December 2020

तो एक कलाकार होता आणि ज्यांचा त्याने खून केला त्यांचे स्केच तयार केले आणि नावेही पोलिसांना सांगितली. त्यामुळे पीडितांची ओळख पटवणं शक्य झालं.

वॉशिंगटन - अमेरिकेतील सिरियल किलर सॅम्युअल लिटिल याचा तुरुंगात तडफडून मृत्यू झाला. सॅम्युअलने तब्बल 93 महिलांचा खून केल्याचं न्यायालयात मान्य केलं होतं. अत्यंत निर्दयीपणे हे कृत्य केल्याचंही त्याने तेव्हा म्हटलं होतं. सॅम्युअलने इतक्या लोकांची हत्या केली होती की स्केचच्या मदतीने पीडितांची ओळख पटवण्याचं काम बराच काळ सुरु होते.  अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्याला मधुमेहासह हृदयविकाराचा आणि इतर काही त्रास होते. 

सॅम्युअल खून प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर 2014 पासून तुरुंगात होता. आजारी पडल्यानंतर त्याला कॅलिफोर्नियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इतक्या वर्षात अनेकदा त्याला तुरुंगात डांबलं होतं मात्र तो बाहेरही आला होता. प्रत्येकवेळी चौकशीत तो खून केल्याचं नाकारत होता. मात्र शेवटी पोलिसांसमोर शरणागती पत्करत त्याने गुन्हा कबूल केला. अधिकाऱ्यांच्या मते जवळपास 700 तास त्याची चौकशी केल्यानंतर अनेक खूनांबद्दल माहिती दिली होती. खूनांबद्दल केवळ आणि केवळं सॅम्युअललाच माहिती होती. 

हे वाचा  - पाकिस्तान: हिंदू मंदिराच्या तोडफोड प्रकरणात 26 कट्टरपंथीयांना अटक, कोर्टानेही घातले लक्ष

सॅम्युअल जितका क्रूर होता त्याशिवाय त्याची दुसरीही एक बाजू होती. ती म्हणजे तो एक कलाकार होता आणि ज्यांचा त्याने खून केला त्यांचे स्केच तयार केले आणि नावेही पोलिसांना सांगितली. त्यामुळे पीडितांची ओळख पटवणं शक्य झालं. त्यानं हेसुद्धा सांगितलं की कोणत्या वर्षी आणि कुठं खून केले. मृतदेहांना कुठे फेकलं याचीही माहिती त्याने दिली. मृत्यूआधी त्याने 1970 ते 2005 दरम्यान 93 लोकांचा खून केल्याचं मान्य केलं होतं. यातील सर्वाधिक खून फ्लोरिडा आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील होते. 

हे वाचा - पाकमध्ये दरवर्षी तब्बल एवढ्या मुलींचे होते धर्मांतर

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना 60 खून सॅम्युअलनेच केल्याचं सिद्ध झालं आहे. इतर खूनांबाबतही शंका नाही. सॅम्युअलने सांगितलेली माहिती चुकीची निघालेली नाही. त्याच्या क्रूर कृत्यासमोर अमेरिकेतील इतर खूनी खूपच लहान ठरतात. सॅम्युअलने ज्या लोकांचा खून केला त्यामध्ये सर्व महिलाच होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america serial killer samual dies in jail who murderd 93 womens