भारताने कोरोना मृत्यूची खरी माहिती लपवली; प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये ट्रम्प यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यात पहिलं प्रेसिडेन्शियल डिबेट बुधवारी सकाळी 6.30 च्या सुमारास सुरु झालं आहे. 

वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगत आता वाढत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यात पहिलं प्रेसिडेन्शियल डिबेट बुधवारी सकाळी 6.30 च्या सुमारास सुरु झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात कोरोना व्हायरसच्या परिस्थितीवरून डिबेटला सुरुवात झाली. 

ट्रम्प यांनी म्हटलं की,'तुम्हाला माहिती नाही. भारत, चीन आणि रशियात किती लोकांचा मृत्यू झाला.' ओहियोतील क्लेवलँडमध्ये केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी आणि क्लेवलँड क्लिनिकमध्ये डिबेटचं आयोजन सुरू आहे. 2016 मध्ये ट्रम्प यांनी 8 गुणांनी ओहियोमध्ये विजय मिळवला होता. 

कोरोना
दरम्यान, कोरोना व्हायरसवर झालेल्या चर्चेवेळी ट्रम्प यांनी जगभरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत धक्कादायक असं वक्तव्य केलं आहे. अनेक देशांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चुकीची दिल्याचा दावा त्यांनी डिबेटमध्ये केला. यामध्ये चीन, रशियासह ट्रम्प यांनी भारतानेसुद्धा मृत्यू झालेल्यांची खरी माहिती दिली नाही असं म्हटलं. 

सर्वोच्च न्यायालय

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीश म्हणून अॅमी कोनी बॅरेट यांच्या नामांकनाचा मुद्दाही डिबेटमध्ये होता. या मुद्द्यावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही निवडणूक जिंकलो आहे. आणि आम्हाला त्यांना निवडण्याचा अधिकार आहे. यावर बोलताना जो बायडेन यांनी म्हटलं की, आम्ही न्यायाच्या विरोधात नाही. 

बायडेन म्हणाले, तुम्ही जरा गप्प बसणार का?
सुरुवातीपासूनच ट्रम्प आणि बायडेन यांच्यातील डिबेटमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात होते. बायडेन यांनी आक्रमकपणे ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ट्रम्प खोटारडे असून त्यांनी आता गप्पच बसावं असंही ते म्हणाले. ट्रम्प यांनी जे काही सांगितलं ते खोटं आहे आणि हेच सत्य आहे. मी इथं त्यांची खोटी वक्तव्ये मोजायला आलेलो नाही. प्रत्येकाला माहिती आहे की ते खोटारडे आहेत असं म्हणताना जो बायडेन इतके भडकले की तुम्ही जरा गप्प बसणार का असा दमही त्यांनी ट्रम्प यांना दिला. 

हे वाचा - निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी ट्रम्प चीनवर ड्रोन हल्ला करतील?

ट्रम्प आणि बायडेन यांच्यात कोरोना व्हायरस आणि आरोग्याच्या मुद्द्यावर डिबेट झाले. यामध्ये बायडेन वरचढ ठरले असून चीन विरोधात अमेरिकेनं केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावर ट्रम्प पुढे आहेत. 

बायडेन यांची सरशी

अमेरिकेत तीन नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीआधी ट्रम्प आणि बायडेन यांच्यात तीनवेळा डिबेट होणार आहे. पुढचं डिबेट 15 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबरला होईल. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला फक्त एक महिनाच उरला आहे. यात अप्रूव्हल रेटिंगमध्ये डोनाल्ड ट्रम्प मागे पडताना दिसत असून जो बायडेन आघाडीवर आहेत. बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा 10 गुणांनी पुढे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america us presidential debate donald trump and joe biden update