बहुचर्चित दावोस परिषदेला सुरुवात

World-Economic-Forum
World-Economic-Forum

जागतिक पातळीवरील आर्थिक जगतात विशेष महत्त्व असलेली दावोस परिषद (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) मंगळवारपासून सुरू झाली. ही परिषद नेहमीप्रमाणे चार दिवस (२१ ते २५ जानेवारी) चालणार आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस या आल्प्स पर्वतामधील छोट्याशा गावात ही जागतिक परिषद भरते. जगातील अनेक राष्ट्रांचे प्रमुख किंवा मंत्रिगण, मोठमोठे उद्योगपती, व्यापारी आणि माध्यमे या परिषदेला हजर असतात. जगातील आर्थिक समस्यांबरोबरच राजकीय, पर्यावरणविषयक तसेच इतरही समस्यांवर विचारविनिमय करणे, हे या परिषदेचे सर्वसाधारण उद्दिष्ट असते. 

सन १९७१ पासून दरवर्षी दावोस येथे ही जागतिक आर्थिक परिषद भरते. सुरुवातीला युरोपीय मॅनेजमेंट फोरम या नावाने सुरू झालेली ही परिषद १९८७ पासून जागतिक आर्थिक परिषद या नावाने भरू लागली आणि तिचे स्वरूपही अधिक व्यापक झाले. ती एक बिगर शासकीय संघटना आहे. दावोस परिषदेला २०१२ पर्यंत युनेस्कोमध्ये निरीक्षकाचा दर्जा मिळाला होता.

परिषदेला हजेरी कोणाची ?
अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या परिषदेला यावर्षी साधारणपणे तीन हजार लोक हजेरी लावणार आहेत. परिषदेला हजर राहण्यासाठी शुल्क आकारले जाते. तसेच निमंत्रित केलेल्यानाच प्रवेश दिला जातो. परिषदेला हजर राहण्यासाठी ६० हजार डॉलर (अंदाजे ४२ लाख), तर चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी २७ हजार डॉलर (अंदाजे २० लाख) आकारले जातात. यावर्षी या परिषदेत पर्यावरणावर अधिक चर्चा होण्याची शक्‍यता आहे. नव्याने नावारूपाला आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थंगबर्ग हिची हजेरी लक्षवेधी ठरली.

परिषदेचे यश
या चर्चापीठाला ९०च्या दशकात अधिक महत्त्व आले. राजकीय नेत्यांच्या दृष्टीने हे तटस्थ व्यासपीठ असून, गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यास अनुकूल आहे. ग्रीस आणि तुर्की या दोन देशांनी युद्ध टाळण्याचा यशस्वी प्रयत्न १९८८ मध्ये दावोसलाच केला होता. पॅलेस्टाइन नेते यासर अराफत आणि इस्राईलचे नेते शिमोन पेरेस यांनीही १९९४ मध्ये इथे तह केला होता. जागतिकीकरणानंतर जागतिक राजकारणातील आर्थिक बाबींना अधिक महत्त्व आले. त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी हा तटस्थ मंच भांडवलदार नेते व राजकारणी या दोघांनाही सोयीचा वाटू लागला.

जोरदार टीका
या परिषदेवर मोठ्या प्रमाणात टीकादेखील केली जाते. अनेक भांडवलदार लोक एकत्र येऊन नफ्या तोट्याचाच विचार करत असल्याने त्याचा जगाला उपयोग होत नसल्याचा काहींचा आक्षेप आहे, तर स्वित्झर्लंडसारख्या निसर्गसमृद्ध प्रदेशात एकीकडे जागतिक पर्यावरणाबद्दल चर्चा करत असताना त्याठिकाणी पोचताना वापरल्या जाणारी हेलिकॉप्टर, वाहनांचे ताफे यामुळे सर्वाधिक प्रदूषण होते, असेही सांगितले जाते. येथे वाहतुकीसाठी वापरली जाणारी अनेक वाहने इलेक्‍ट्रिक आणि हायब्रीड असल्याचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com