'बायडेन फ्रॉम मुंबई', अमेरिकेच्या बायडेन यांचा भारतात नातलग असल्याचा किस्सा ऐकलात का?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. बायडेन उप राष्ट्रपती असताना मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी बायडेन फ्रॉम मुंबईचा किस्सा सांगितला होता. 

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष (US Election 2020) पदाच्या निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा सर्वांनाच लागून राहिली होती. अखेरच्या टप्प्यात बायडेन आणि ट्रम्प (JOe Biden) यांच्यातील मतांचा फरक वाढत चालला होता आणि बायडेन यांनी बाजी मारली आहे. अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून  बायडेन निवडून आले आहेत. सध्या बायडेन यांना 284 इलेक्टोरल मते मिळाली असून डोनाल्ड ट्रम्प 214 मते मिळवू शकले. जो बायडेन अनेकदा भारतात आले आहेत. उपराष्ट्रपती असताना त्यांनी भारताचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी आपलं भारतासोबतचं कनेक्शन सांगितलं होतं. यामध्ये त्यांनी 'बायडेन फ्रॉम मुंबई'चा (Biden From Mumbai) एक किस्सा सांगितला होता. 

1972 मध्ये जो बायडेन हे सिनेटर म्हणून डेलावेअरमधून निवडणून आले होते. तेव्हा मुंबईतील एका बायडेन आडनावाच्या व्यक्तीने त्यांना अभिनंदन करणारे पत्र पाठवले होते. अभिनंदन करणारे पत्र लिहिताना त्यावर बायडेन फ्रॉम मुंबई असा उल्लेखही करण्यात आला होता. याशिवाय एकमेकांसोबत नातं असल्याचं सांगितलं होतं. जो बायडेन हे त्यावेळी 29 वर्षांचे होते आणि पत्र लिहिणाऱ्या बायडेन यांची भेट घेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र कौटुंबिक आणि राजकीय बंधनांमुळे ते शक्य झालं नव्हतं. पाच दशकांपासून ही इच्छा अद्याप पूर्ण झालेली नाही. जेव्हा जेव्हा बायडेन भारतीय अमेरिकन किंवा भारतीय नेत्याची भेट घेतात तेव्हा बायडेन फ्रॉम मुंबईचा उल्लेख करतातच.

हे वाचा - बायडन-ट्रम्प लढाईत अमेरिकेनं रचला इतिहास; मोडला 120 वर्षांपूर्वीचा विक्रम

अमेरिकेचे उपराष्ट्रपती झाल्यानंतर बायडेन पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले होते. 24 जुलै 2013 रोजी मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लोकांना संबोधित केलं होतं. त्यावेळी बायडेन यांनी बायडेन फ्रॉम मुंबईचा किस्सा लोकांना ऐकवला होता. बायडेन म्हणाले होते की, '1972 मध्ये जेव्हा मी 29 वर्षांचा होतो तेव्हा अमेरिकेत सीनेटरम म्हणून निवडून आलो होतो. त्यावेळी मला एक पत्र मिळालं होतं आणि त्याचं उत्तर मला देता आलं नाही याचा आजही पश्चाताप आहे. इथं कोणी वंशावळ तज्ज्ञ असेल तर मला मदत करा. मला मुंबईतून बायडेन नावाच्या एका व्यक्तीचे पत्र मिळाले होते आणि त्यात म्हटलं होतं की आमच्या दोघांचे एकमेकांशी नाते आहे. 

आपल्या पूर्वजांचे काहीतरी कनेक्शन असण्याची शक्यता आहे किंवा 1700 मध्ये ईस्ट इंडिया ट्रेडिंग कंपनीत काम करण्यासाठी कोणीतरी मुंबईला आलं असेल असंही बायडेन म्हणाले होते.  त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये एका भाषणामध्ये बायडेन यांनी म्हटलं होतं की, त्यांचे एक पूर्वज होते ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम केलं आणि तेव्हा ते भारतात गेले होते. 

हे वाचा - US Election : थेट अंतराळातून दिलं मत; जाणून घ्या कशी होते ही प्रक्रिया

युएस इंडिया बिझनेस काउन्सिलच्या एका बैठकीत 21 सप्टेंबर 2015 मध्ये बोलताना बायडेन यांनी पुन्हा एकदा बायडेन फ्रॉम मुंबईचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, 'बायडेन फ्रॉम मुंबई' आणि माझे पूर्वज एकच होते. 1848 मध्ये जे ईस्ट इंडिया टी कंपनीसाठी काम करत होते. त्यातील कुणीतरी भारतीय महिलेशी लग्न केलं आणि भारतातच राहिले. मुंबईत 2013 मध्ये बायडेन यांनी लोकांना सांगितलं होतं की, जर हे खरं असेल तर मी भारतातही निवडणूक लढू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: biden from mumbai man who wrote letter to joe biden in 1972