मी तयारच आहे मात्र ट्रम्प कोरोनाग्रस्त असताना दुसरी प्रेसिडेंशियल डिबेट नको - बायडेन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

दुसरी डिबेट मियामीमध्ये 15 ऑक्टोबर रोजी नियोजित आहे तर तिसरी 22 ऑक्टोबर रोजी टेनेसमध्ये आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येवून ठेपली आहे. नियोजित प्रेसिडेंशियल डिबेटमधील पहिली डिबेट नुकतीच पार पडली आहे. मात्र, आणखी दोन डिबेट्स बाकी आहेत. महिन्यावर आलेल्या या निवडणुकीमुळे प्रचाराला वेग आला आहे. असं असलं तरीही विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे सगळीकडेच आता काय होणार असे शंका-कुशंकांचे वातावरण आहे. यातच आता डेमोक्रॅटीक पार्टीचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेन यांनी म्हटलंय की, जर डोनाल्ड ट्रम्प आजारी असतील तर आपल्याला ही डिबेट केली नसली पाहिजे. मंगळवारी गेटीजबर्गवरुन परतताना पत्रकारांशी ते बोलत होते. 

हेही वाचा - ट्रम्प यांना फेसबुक-ट्विटरचा दणका; कोरोनाला हलक्यात घेण्याची केली चूक
अमेरिकेत द्विपक्षीय लोकशाही आहे. तिथल्या निवडणुका या दर चार वर्षांनी होतात. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीआधी तीन प्रेसिडेंशियल डिबेट घडवून आणल्या जातात, ज्याआधारे अमेरिकेच्या तत्कालिन प्रश्नावर सत्ताधारी उमेदवार आणि विरोधातील उमेदवार यांची मते, भुमिका आणि योग्यता मतदारांसमोर स्पष्ट होते. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात ही पहिली डिबेट 29 सप्टेंबरला झाली होती. या दरम्यान दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. दुसरी डिबेट मियामीमध्ये 15 ऑक्टोबर रोजी नियोजित आहे तर तिसरी 22 ऑक्टोबर रोजी टेनेसमध्ये आहे. मतदान 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्पच कोरोनाग्रस्त असल्याने या डिबेट्स, एकूण प्रचार आणि प्रक्रिया कशी होणार याबाबत संभ्रम  आहे. जो बायडेन यांनी म्हटलंय की कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे आपण पालन करायला हवे. 

हेही वाचा - मास्कच्या वापरास पाठिंबा द्या : बायडेन
खुप सारे लोक कोरोनाबाधित होत आहेत. ही एक गंभीर समस्या आहे. मला क्लेवलँड क्लिनिकच्या डॉक्टरांकडून यासंबधीची माहिती मिळाली आहे. मला हे माहित नाहीये की, राष्ट्राध्यक्ष सध्या कसे आहेत. मी डिबेटसाठी तयार आहे मात्र मी आशा करतो की सर्व नियमांचे पालन केले जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी एक ट्विट केलंय ज्यात ते म्हणालेत की 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रेसिडेंशियल डिबेटसाठी ते उत्सुक आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलोनिया दोघेही कोरोना पॉसिटीव्ह सापडले होते. 

पहिली प्रेसिडेंशियल डिबेट खूपच गरमागरम झाली होती. दोन्हीही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप लावले होते. डोनाल्ड ट्रम्प बावळट आहेत. ते रशियाचे पिल्लू आहेत, असं जो बायडेन यांनी म्हटलं होतं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: biden says if trump has covid should not have second presidential debate