esakal | धक्कादायक माहिती स्पष्ट! तालिबानचा धोका बायडेन-घनींच्या गावीही नव्हता
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक माहिती स्पष्ट! तालिबानचा धोका बायडेन-घनींच्या गावीही नव्हता

धक्कादायक माहिती स्पष्ट! तालिबानचा धोका बायडेन-घनींच्या गावीही नव्हता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्यात २३ जुलै रोजी दूरध्वनीवर सुमारे १४ मिनिटे चर्चा झाली तेव्हा काबूलच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या तालिबानचा धोका त्यांच्या गावीही नसल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा: मोठी बातमी! अनिल देशमुख यांच्या जावयाला सीबीआयनं घेतलं ताब्यात

या नेत्यांमधील संवादाचा तपशील रॉयटर्स वृत्तसंस्थेने मिळविला आहे. त्यानुसार या नेत्यांनी लष्करी मदत, राजकीय धोरण आणि संदेशांबाबतची रणनीती अशा विषयांवर चर्चा केली. संपूर्ण देश तालिबानसमोर शरणागती पत्करेल असा अंदाजही त्यांना आला नाही. अफगाणिस्तानमधील ढासळती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तुमच्याकडे एखादी योजना आहे का, त्याची माहिती कळली तर लढाऊ विमानांसह मदत करण्याची तयारी बायडेन यांनी दर्शविली.

या चर्चेदरम्यान बराच वेळ बायडेन यांनी अफगाण सरकारसाठी आकलनशक्ती ही समस्या असल्याचा मुद्दा ठसविण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, तालिबानविरुद्धची लढाई चांगली होत नसल्याचा समज जगभर तसेच अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये पसरला आहे. हे खरे असो किंवा नसो, पण वेगळे चित्र निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रमुख राजकीय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नव्या लष्करी रणनितीला पाठिंबा दिल्यास हे बऱ्याच प्रमाणात साध्य होईल.

हेही वाचा: '12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांशी सकारात्मक चर्चा'

तीन लाख विरुद्ध ७०-८० हजार

अफगाण सशस्त्र दलांची बायडेन यांनी प्रशंसा केली. अमेरिकेने प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ दिलेले लष्कर सर्वोत्तम असल्याचे घनी यांना सांगून बायडेन पुढे म्हणाले की, तुमच्याकडील उत्तम शस्त्रे असलेले तीन लाख सैनिक विरुद्ध ७०-८० हजार तालिबानी असा मुकाबला आहे आणि जोरदार संघर्ष करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. त्यानंतर विरोधाभास असा की काही दिवसांत विविध प्रांतात फारसा प्रतिकार न करता अफगाण लष्कराने शरणागती पत्करण्यास सुरवात झाली.

loading image
go to top