ट्विटरनंतर फेसबुकचा ट्रम्पना डबल दणका; दोन आठवड्यांसाठी केलं ब्लॉक

टीम ई सकाळ
Thursday, 7 January 2021

कॅपिटॉल इमारतीत ट्रम्प समर्थकांनी आक्रमकपणे फिरत आणि खासदारांना शोधत ‘ते कुठे आहेत’ अशा घोषणा मोठमोठ्याने दिल्या. तसंच सभागृहात घुसत सिनेटच्या अध्यक्षांच्या, काँग्रेस सभापतींच्या खुर्चीवरही ताबा मिळवला.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यानंतर सातत्याने ते चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. बुधवारी कॅपिटॉलमध्ये चर्चा सुरु असताना ट्रम्प समर्थकांनी हिसांचार केल्यानं चार जणांचा मृत्यू झाला. यावेळी ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट ब्लॉक केले होते. आता ट्विटरपाठोपाठ फेसबुकने ट्रम्प यांचे अकाउंट ब्लॉक केले असून दोन आठवड्यापर्यंत तरी ते ब्लॉक राहील असं सांगितलं आहे. 

अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत असा गोंधळ झाला नव्हता. याआधी 204 वर्षांपूर्वी ब्रिटनने आक्रमण केलं होतं. त्यानंतर आता कॅपिटॉलवर हल्ला झाला. मात्र हा परकियांनी नव्हे तर इथल्याच नागरिकांनी केल्यानं हे धक्कादायक असंच आहे. या गोंधळानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसंच जो बायडेन हेच पुढचे राष्ट्राध्यक्ष असतील यावरही अमेरिकन काँग्रेसनं शिक्कामोर्तब केलं. 

हे वाचा - 206 वर्षांपूर्वीही पेटली होती 'कॅपिटॉल'; अमेरिकेच्या संसदेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षांकडून हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हिंसाचाराचा निषेध करत अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॅट पॉटिंजर, मेलानिया ट्रम्प यांच्या प्रशासकीय प्रमुख स्टेफी ग्रिशम आणि व्हाइट हाऊसच्या उप माध्यम सचिव सारा मॅथ्यूज्‌ यांनी राजीनामा दिला आहे.

हे वाचा - ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची मागणी, रिपब्लिक नेतेही गेले विरोधात

कॅपिटॉल इमारतीत ट्रम्प समर्थकांनी आक्रमकपणे फिरत आणि खासदारांना शोधत ‘ते कुठे आहेत’ अशा घोषणा मोठमोठ्याने दिल्या. तसंच सभागृहात घुसत सिनेटच्या अध्यक्षांच्या, काँग्रेस सभापतींच्या खुर्चीवरही ताबा मिळवला. अनेक कार्यालयांमध्ये घुसून गोंधळ घालण्यात आला. तसंच सभागृहात ‘ट्रम्प हेच विजयी झाले आहेत’ अशा आरोळ्या ठोकल्या.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: capitol violence Facebook extends donald trump block at least two week