ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची मागणी, रिपब्लिक नेतेही गेले विरोधात

सकाळ ऑनलाइन टीम
Thursday, 7 January 2021

उर्वरित 13 दिवसांच्या त्यांच्या कार्यकाळावर संकट ओढावले आहे. हिंसाचारामुळे खुद्द ट्रम्प यांचे रिपब्लिकन खासदार आणि कॅबिनेट अधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांना 20 जानेवारीपूर्वी राष्ट्राध्यक्ष पदावरुन हटवू इच्छितात.

वॉशिंग्टन- अमेरिकेतील यूएस कॅपिटल येथे उफाळलेला हिंसाचार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अडचणीचा ठरु शकतो. हिंसाचारानंतर ट्रम्प यांच्याविरोधातील आवाजाला धार आली आहे. उर्वरित 13 दिवसांच्या त्यांच्या कार्यकाळावर संकट ओढावले आहे. हिंसाचारामुळे खुद्द ट्रम्प यांचे रिपब्लिकन खासदार आणि कॅबिनेट अधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांना 20 जानेवारीपूर्वी राष्ट्राध्यक्ष पदावरुन हटवू इच्छितात. इतकेच नव्हे तर रिपब्लिक पक्ष ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला जाण्याच्या बाजूने आहे. 

'सीएनएन'च्या वृत्तानुसार, काही वरिष्ठ कॅबिनेट सदस्य 25 व्या संविधान दुरुस्ती लागू करण्याचा विचार करत आहेत. अमेरिकन संविधानात 25 व्या दुरुस्तीनुसार जर राष्ट्राध्यक्ष आपल्या कर्तव्याचे पालन करण्यास अक्षम ठरले तर त्या स्थितीत काय करायचे. यावर विचारविनिमय सुरु असून ट्रम्प यांना हटवण्यासाठी पर्याप्त खासदारांचे समर्थन मिळेल की नाही हे स्पष्ट झालेले नाही. 

हेही वाचा- US Capitol : चार मृत्यू, 52 ट्रम्प समर्थक अटकेत; अमेरिकेत नेमकं काय आणि का घडलं?

रिपब्लिक नेते आणि राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार राहिलेले मिट रोमनी यांनी ट्रम्प यांना स्वार्थी म्हटले आहे. ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना निवडणुकीबाबत चुकीची माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले. रोमनी यांनी यूएस कॅपिटल हिंसा हा देशद्रोह असल्याचे सांगितले आणि हे केवळ ट्रम्प यांच्या उकसवण्यामुळे झाल्याचा आरोप केला. आणखी एक रिपब्लिक नेते लिज शेने म्हणाले की, ही गर्दी ट्रम्प यांनी जमा केली होती, यात कोणतीच शंका नाही. त्यांनी त्या समूहाशी चर्चा केली, त्यांनीच भडकवण्याचे काम केले. 

विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनीही हिंसेला अमेरिकेतील काळा दिवस असल्याचे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पदावरुन हटवण्यासाठी हे कारण पुरेसे असल्याचे एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हा यंत्रणेसाठी मोठा धक्का असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले. 

हेही वाचा- डोनाल्ड ट्रम्प यांचे टि्वट डिलीट; फेसबुक, टि्वटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटही सस्पेंड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US President Donald Trump should be removed from office before January 20 says Republican leaders and Cabinet officials