Coronavirus : इटलीत रस्त्यांवर स्मशानशांतता

egypt
egypt

मिलान - विषाणू संसर्गाची बाधा झालेल्या इटलीतील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले असून अनेक भागांमध्ये भीतीपोटी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही लोक पुढे येईनासे झाले आहेत. देशातील वृद्धांभोवतीचा या विषाणूंचा फास आणखी आवळल्या गेला असून रस्ते, चौक, रेस्टॉरंट ओस पडले. 

इटलीतील ज्या कोडोग्नो शहरातून या विषाणूचा संसर्ग सुरू झाला तेथील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इटलीमध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून आवश्‍यक कामांसाठी घराबाहेर पडण्याच्या सूचना करण्यात आल्या. सरकारने पब, रेस्टॉरंट, ब्युटी सेंटर, हॉटेल आणि कँटिन बंद करण्याचा निर्णय घेतला असून आयटी कंपन्यांनीही सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाचा विळखा...
युरोपातील विमानतळांवर भाऊगर्दी

भारताने प्रवासबंदी लागू करण्यापूर्वी मायदेशी येण्यासाठी आज युरोपसह ब्रिटनच्या प्रवाशांची विमानतळावर दिवसभर धावपळ सुरू होती. भारताने युरोप, तुर्कस्तान आणि ब्रिटनमधील नागरिकांसाठी ३१ मार्चपर्यंत दारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे ब्रिटनमधील भारतीयांनी आज मायदेशाचा रस्ता धरला. भारतीयांप्रमाणेच चिनी प्रवाशांनाही मायदेशी परतण्यासाठी तत्काळ व्हिसा मिळावा म्हणून त्यांच्या दूतावासाशी संपर्क साधला होता पण तेथूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही असे त्या विद्यार्थ्याने सांगितले. 

पाकिस्तानमध्ये पहिला बळी
पाकिस्तानमध्येही कोरोनाचा विषाणू हातपाय पसरू लागला असून, या संसर्गामुळे आज पाकमध्ये पहिला बळी गेला. लाहोरमधील मायो हॉस्पिटलमध्ये एका इमरान नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. इमरान हा पाकिस्तानातील हाफीजाबादचा रहिवासी असून तो नुकताच इराणमधून मायदेशी परतला होता.

दोन दशके प्रभाव राहणार
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अर्थकारण तर कोलमडणार आहेच, पण त्याचबरोबर संपूर्ण उन्हाळाभर हा विषाणू जिवंत राहून तो पुन्हा हिवाळ्यामध्ये अवतरेल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विषाणू संशोधनामध्ये सहभागी असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दोन दशके या विषाणूचा पृथ्वीवर प्रभाव राहील असे म्हटले आहे. प्रत्येकाची रोगप्रतिकार क्षमता या विषाणूचा सामना करण्याएवढी सक्षम नसते, त्यामुळे गर्दी टाळणे, स्वत:ला वेगळे ठेवणे हा संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चीनमध्ये संसर्ग सुरूच
चीनमधील कोरोनाच्या संसर्गाचा केंद्रबिंदू असलेल्या वुहान शहरामध्ये आज कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला असून तेरा जणांचा मृत्यू झाला आहे, यामुळे चीनमधील एकूण मृतांची संख्या ३ हजार २२६ वर पोचली असल्याचे चिनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागातील विषाणू संसर्गाची तीव्रता कमी होऊ लागल्याने येथे तैनात वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांना टप्प्याटप्प्याने माघारी बोलावण्यात येईल.

नमस्कार, कोरोनाची जागतिक साथ हा फारच चिंताजनक प्रकार आहे. मात्र, आपण भांबावून जाऊ नये, तसेच अफवाही पसरवू नये. आपण सर्व जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे योग्य स्वच्छता पाळावी. ज्यांना खोकला आणि ताप आहे, त्यांनी इतरांपासून दूर राहत संसर्गाचा प्रसार रोखावा. आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना पाळा आणि सुरक्षित, निरोगी राहा.
- लता मंगेशकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका

धार्मिक स्थळे बंद
अमेरिकेतील सर्व मोठी शहरे बंद करण्यात आली असून बार, रेस्टॉरंट आणि शाळांनाही टाळे लावण्यात आले होते.  युरोपमध्ये जर्मनीने सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला असून चर्च, मशिदी, सिनेगॉग, क्रीडा मैदाने बंद करण्यात आली आहेत. स्पेनमध्ये सीमा बंद करण्यात आला असून ब्रिटननेही नागरिकांनी अनावश्‍यक प्रवास टाळावा, परस्परांशी संपर्क ठेवू नये, असे आवाहन केले असून स्वित्झर्लंडनेही आणीबाणी जाहीर केली आहे. 

बँक ऑफ जपानचा पुढाकार
फ्रान्समध्ये पर्यटकांवर कठोर निर्बंध लावण्यात आले असून, या देशाची दारे परदेशी पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. बँक ऑफ जपानने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहेत. जगभरातील सर्वच देशांच्या बँकांना लोकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यात अपयश आल्याने जगभरातील रोखे बाजार आणि तेलाच्या किंमती कोसळू लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com