Coronavirus : युरोपीय देशांच्या सीमा बंद

वृत्तसंस्था
Wednesday, 18 March 2020

पोलंडमध्ये मंत्र्यास वेगळे ठेवले
वॉर्सा : पोलंडमधील एका मंत्र्याला विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर तेथील पोलंड सरकारने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला. दहा मार्च रोजी पोलंड सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वच जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. या सर्व संशयितांवर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली रुग्णालयांमध्ये उपचार केले जाणार आहेत.देशात खबरदारी घेतली जात आहे.

जीनिव्हा - विषाणू संसर्गाच्या भीतीने युरोपमधील सर्वच देशांनी त्यांच्या सीमा बंद केल्याने जागतिक अर्थकारणदेखील कोलमडले आहे. या विषाणूचा भविष्यातील संसर्ग रोखायचा असेल तर जगभरातील सर्वच संशयितांची चाचणी घेणे गरजेचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंधळेपणाने तुम्ही आगीचा सामना करू शकत नाही, असे आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरॉस घेबरायसेस यांनी म्हटले आहे. प्रत्येक संशयिताची टेस्ट करणे गरजेची असून हा विषाणू जगभरात वेगाने पसरतो आहे. सध्या जगभरातील सर्व देश निर्बंध घालत असून प्रत्येक देशाची सीमा बंद होते आहे, लोकांना घरी बसून काम करण्याचे आदेश दिले जात आहे. 

वुहानमध्ये नोव्हेंबरमध्येच आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण
 
मायदेशाची दारे बंद
युरोपीय महासंघाचे सदस्य असणारे सर्व देश, तुर्कस्तान, आणि ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठीही मायदेशी परतण्याची दारे बंद झाली आहेत. उद्या (ता.१८) पासून ही बंदी लागू होणार आहे. संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान आणि कुवेतमधून मायदेशी परतलेल्या नागरिकांना चौदा दिवसांसाठी वेगळे ठेवण्यात येईल.

मला वाटलं थट्टाच सुरू आहे...
मेलबर्न - न्यूझीलंडविरोधात एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू असताना अचानक विलगीकरण कक्षातच राहण्याची वेळ ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याच्यावर आली. दौऱ्यानिमित्त विविध देशांमध्ये फिरून आलेल्या रिचर्डसनची चाचणी घेतली असता त्याच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणे आढळली होती. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी तातडीने उपचार घेण्यास सांगितले. या वेळी आपली थट्टाच सुरू आहे, असे त्याला वाटले. आता मात्र त्याला घरी सोडण्यात आले आहे. 

Coronavirus : दहशतवाद्यांनाही दहशत

महिला मरिन पायलटला कोरोनाचा संसर्ग?
कोलकता - भारतातील पहिल्या महिला मरिन पायलटला (जहाज संचालन अधिकारी) कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. त्यांना कोलकत्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या मरिन पायलटला सोमवारी (ता.१६) रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, निरीक्षणाखाली ठेवले आहे, अशी माहिती कोलकता पोर्ट ट्रस्टचे प्रवक्ते संजॉय मुखर्जी यांनी दिली. संबंधित अधिकारी सुटीनिमित्त  काही दिवसांपूर्वी कोलंबोला गेल्या होत्या. त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 

हिमाचलमधील मंदिर भाविकांसाठी बंद
धर्मशाला (हिमाचल प्रदेश) - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी देवळात जाणे टाळावे, असे आवाहन हिमाचल प्रदेश सरकारने केले आहे. देशात शंभराहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. हिमाचलमधील सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या मंदिरातील देवदर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांग्रा येथील तीन शक्तिपीठ ज्वालामुखी, माता ब्रजेश्‍वरी आणि माता चामुंडा येथील मंदिरे बंद करण्यात आली आहेत. सरकारने अधिसूचना काढल्यानंतर मंदिर प्रशासनाने भाविकांना देवळात येण्यास मनाई केली आहे. 

‘डब्ल्यूएचओ’कडून भारताचे कौतुक
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारताच्या या जबाबदारीपूर्ण वागणुकीचे कौतुक केले. ‘डब्ल्यूएचओ’चे भारतातील प्रतिनिधी हेंक बेकडॅम यांनी आज भारतीय वैद्यक संशोधन परिषदेतील (आयसीएमआर) अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. ते म्हणाले की, भारत सरकारमध्ये थेट पंतप्रधान कार्यालयाच्या पातळीपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी होत असलेले जबाबदारीपूर्ण काम प्रशंसनीय आहे. यामुळे भारताला आत्तापर्यंत कोरोनाचा उद्रेक रोखण्यात यश आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: European countries close the borders