iPhone च्या कारखान्यातून कामगारांचे पलायन

चीनमधील आयफोनच्या कारखान्यातील स्थलांतरित कामगार तेथून पळून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे
iphone company workers employed migration
iphone company workers employed migration

बीजिंग : चीनमधून कोरोनाचे पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. तेथे या विनाशी विषाणूच्या संसर्गाची नवी लाट येण्याच्या भीतीने सरकारने काही भागात लॉकडाउन जाहीर केले आहे. या लॉकडाउनपासून बचाव करण्यासाठी चीनमधील आयफोनच्या कारखान्यातील स्थलांतरित कामगार तेथून पळून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

झेंगझाऊ शहरात फॉक्सकॉनमध्‍ये ॲपल कंपनीच्या मोबाईल फोनची निर्मिती होते. शहरामध्‍ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तेथे लॉकडाउन लागू केलेले आहे. नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोरोनाला पायबंद करण्यासाठी चिनी सरकारने तयार केलेल्या ‘कोविड ॲप’पासून बचाव करण्यासाठी ‘फॉक्सकॉन’मधील स्थलांतरिक कर्मचारी पलायन करीत असल्याचे ट्विट बीबीसी वाहिनीचे चीनमधील बातमीदार स्टिफन मॅकडोनेल यांनी केले आहे.

येथील सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओही शनिवारी (ता.२८) शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे. आयफोन निर्मितीच्या प्रकल्पाबाहेरील संरक्षक कुंपणावरून बाहेर उड्या मारणारे कामगार व्हिडिओत दिसत आहेत. बाहेर पडल्यानंतर हे कर्मचारी घरी पोहचण्यासाठी १०० किलोमीटर अंतरापर्यंत चालत जात होते.

मॅकडोनेल यांनी दिलेल्या माहितीनुसार झेंगझाऊ फॉक्सकॉनमध्ये सुमारे तीन लाख कर्मचारी काम करीत असून तेथे जगातील निम्म्‍या आयफोनची निर्मिती होते. कोरोनाच्या प्रादुर्भावाने येथील अनेक कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवले असल्याचे आधी सांगण्यात आले होते. लॉकडाउनमुळे निर्माण झालेला गोंधळ आणि अन्नटंचाई यामुळे हेनान प्रांतातील स्थलांतरित कामगार घरी पायी चालत जात असल्याचे ‘डोयिन’ या चिनी व्हिडिओ सेवेवरुन प्रसारित झालेल्या चित्रफितीतून दिसत आहे. महार्गानजीक राहणारे स्थानिक नागरिकांनी या कामगारांना मोफत अन्न आणि इतर मदत पुरविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com