चीनमध्ये कोरोना व्हायरसचे थैमान; भारताचा मोठा निर्णय

Corona Virus
Corona Virus

बीजिंग/मुंबई - कोरोना व्हायरसचा वेगाने होत असलेला प्रसार लक्षात घेऊन, चीनमधील वुहान शहरातील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने 423 प्रवासी क्षमता असलेले जंबो विमान मुंबई विमानतळावर सज्ज ठेवले आहे. परराष्ट्र आणि आरोग्य मंत्रालयाकडून त्यांना अद्याप परवानगी मिळालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, वुहानमध्ये 250 भारतीय आहेत. त्यांना भारतात परत आणण्याची तयारी सुरू असून, त्यांना आणल्यानंतर भारतात हा संसर्गजन्य रोग पसरणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येत आहे. चीनहून परतलेल्या तीन जणांना येथील राममनोहर लोहिया रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. हे तिघेही गेल्या महिनाभरात चीनहून परतले होते. त्यांना श्‍वसनाचा त्रास झाल्यानंतर रुग्णालयात भरती केले होते. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

साडेचार हजार जणांना लागण 
कोरोना व्हायरस विषाणूचा संसर्ग जगभरात पसरत असून, संसर्गाचे प्रसार केंद्र असलेल्या चीनमध्ये या विषाणूमुळे आज आणखी 24 जणांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोना व्हायरसच्या चीनमधील बळींची संख्या 106 वर पोचली असून, एकूण 4515 जणांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तिबेट वगळता चीनच्या सर्व प्रांतांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. चीनशिवाय थायलंड (3), दक्षिण कोरिया (3), अमेरिका (3), व्हिएतनाम (2), सिंगापूर (4), मलेशिया (3), नेपाळ (1), फ्रान्स (3), ऑस्ट्रेलिया (4) आणि श्रीलंकेत (1) कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. चीनमधील हुबेई प्रांतापासून संसर्गाला सुरुवात झाली आहे. याच प्रांतात आणखी 24 जणांचा मृत्यू झाला असून, 1291 नवे रुग्ण आढळले आहेत. या प्रांतातील रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांत जवळपास 32 हजार तापाचे रुग्ण भरती झाले आहेत. 

हॉंगकॉंगकडून रेल्वेसेवा बंद 
चीनमध्ये विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी हॉंगकॉंगने चीनला जोडणारी वेगवान रेल्वेसेवा आणि फेरीबोट सेवा स्थगित केल्या आहेत. विमानोड्डाणेही कमी करण्यात आली आहेत. या विषाणूचा धोका ओळखण्यात चूक झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने कबूल केले आहे. आता मात्र संघटनेने सर्व देशांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. चिनी नववर्षाची सर्व तयारी झाली असताना हा संसर्ग उद्‌भवल्याने चीन सरकारने उत्सव दोन फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला आहे. तसेच, शाळांच्या सुट्याही वाढविल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com