चीनची युद्धाची खुमखुमी हा तर बहाणा! खरं कारण वेगळंच, 1962 ला सुद्धा अशीच अवस्था

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

भारतासोबत सीमेवर सारख्या कुरापती करणे, ही चीनची जुनीच सवय आहे. कट्टरपंथी राष्ट्रवादाचा दिखावा करत चीन स्वतःच्या देशातील नागरिकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे.

बिजिंग - भारतासोबत सीमेवर सारख्या कुरापती करणे, ही चीनची जुनीच सवय आहे. कट्टरपंथी राष्ट्रवादाचा दिखावा करत चीन स्वतःच्या देशातील नागरिकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. कारण चीनमध्ये सध्या मोठी अन्नधान्याची टंचाई सुरू आहे. ऑगस्टमध्ये चिनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी 'क्लीन युवर प्लेट'ची मोहीम सुरू केली तेव्हाच हे उघड झाले. एवढेच नव्हे तर एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत चीनने दक्षिण चीन समुद्रात जवळपास 5 वेळा युध्दसराव केल्याचा दिखावासुद्धा केला आहे.  गरीबी आणि भुकबळी यावरचं लक्ष दुसरीकडे करण्यासाठी चीन देशभक्ती आणि राष्ट्रवादावर लक्ष केंद्रित करत आहे.

चीन भारताशी सीमाप्रश्न वाढवण्याची ही पहिली वेळ नाही, याअगोदरही चीनने नागरिकांचे भूकबळीवरून लक्ष हटविण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.  चीनमध्ये 1962 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता, त्यावेळीसुद्धा चीनचे सर्वोच्च नेते माओ त्से तुंग यांनी भारताशी विनाकारण सीमाप्रश्न वर काढत युद्ध छेडले होते. तेव्हा चीनमध्ये हजारो लोक उपासमारीने मरण पावले. या भूकमारीविरुध्द त्यावेळेस चीनमध्ये 'ग्रेट लीप फॉरवर्ड'  चळवळ देखील उदयास आली होती. ही चळवळ तत्कालीन चिनी सरकारच्या नियमांच्या विरोधात होती. नेमके त्याच पध्दतीने सध्या चिनमध्ये 'चिनी वुल्फ वॉरियर' आंदोलन उभारु पाहत आहे. 

हे वाचा - "यूएईने मुस्लिम जगताचा विश्वासघात केला"

कोरोनातून सावरल्याचा आव चीन सध्या आणत असला तरी तो सध्या अन्नधान्याच्या तीव्र संकटात आहे.  ग्लोबल टाईम्सच्या म्हणण्यानुसार, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अन्न सुरक्षा वाढविण्यासाठी 2013 क्लीन युवर प्लेटची मोहीम पुन्हा सुरू केली होती. आता पाश्चात्य माध्यमांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की चिनी प्रशासन या योजनेद्वारे चीनमध्ये निर्माण झालेल्या अन्नसंकट लपवत आहे.  चीनच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै या कालावधीत चीनच्या धान्याच्या आयातीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 22.7 टक्के (74.51 दशलक्ष टन) वाढ झाली आहे. चीनमध्ये यावर्षीच्या गव्हाच्या आयातीत 197 टक्के वाढ दिसून आली आहे.  मागील वर्षीच्या तुलनेत जुलैमध्ये मक्याच्या आयातीमध्येही 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता प्रश्न असा उद्भवत आहे की चीनकडे अन्नधान्याचे पुरेसे प्रमाण आहे, तर मग त्यांना आयात का वाढवावी लागत आहे?

हे वाचा - 'कुणीच कल्पना केली नव्हती अशी गोष्ट आम्ही केली', कोरोना लशीबद्दल ट्रम्प यांची मोठी घोषणा

चीन सध्या या दशकातील सर्वात मोठ्या टोळधाडीच्या हल्ल्याला सामोरं जात आहे. ज्यामुळे देशाच्या दक्षिणेकडील भागात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या टोळधाडीच्या नियंत्रणासाठी चिनी सैन्यालाही सरकारने आता मैदानात उतरवले आहे. टोळधाडीचं संकट कमी की काय म्हणून आता चीनमध्ये महापूराची आपत्ती ओढावली आहे. या भीषण पुरामुळे हजारो एकरातील पीके नष्ट झाली आहेत. चीनच्या सुपिक भागात या महापुराचा मोठा फटका बसला आहे. यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china try to make war situation main reason is food crisis in country like 1962 history