कोरोना जाता जात नाही

Friday, 20 November 2020

कोरोनाच्या विषाणूचा प्रसार व साथीबाबत जगातील स्थिती पाहिली, की कोरोना जाता जात नाही, असं दिसत आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रातील देश, युरोप, भारतासह दक्षिण आशिया, अमेरिका, लॅटीन अमेरिका व आफ्रिका असो की ऑस्ट्रेलिया कोणत्याही खंडाला कोरोनाने सोडलेले नाही.

कोरोनाच्या विषाणूचा प्रसार व साथीबाबत जगातील स्थिती पाहिली, की कोरोना जाता जात नाही, असं दिसत आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रातील देश, युरोप, भारतासह दक्षिण आशिया, अमेरिका, लॅटीन अमेरिका व आफ्रिका असो की ऑस्ट्रेलिया कोणत्याही खंडाला कोरोनाने सोडलेले नाही. त्याचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय. दुसरीकडे साथीवर परिणामकारक लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची स्पर्धा शिगेला पाहोचली असून, लस 95 टक्क्यांपेक्षा अधिक यशस्वी ठरल्याचे दावे या कंपन्यांनी केले आहेत. ती डिसेंबर 2020 मध्ये अथवा 2021 मध्ये उपलब्ध होणार, असे भाकित आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी ती विनामूल्य उपलब्ध करण्याचे आश्वासन देऊनही सामान्यापर्यंत ती केव्हा पोहोचणार, याबाबत काहीही सांगता येणार नाही.  

जगातील सर्वात कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे, ती दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये. काल प्रसिद्ध झालेल्या ब्लुमबर्गच्या वृतानुसार, घराबाहेर व्यायाम करण्यास अथवा श्वानाला फिरायला नेण्यास मनाई करण्यात आली असून, येत्या सहा दिवसात रोज घरातील केवळ एक व्यक्ती अत्यावश्य़क वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडेल. शाळा, विद्यापिठे, कॅफेज्, रेस्टॅरन्ट्स बंद करण्यात आलेत. विवाह समारंभ व अत्यंविधी संस्कारांना बंदी असून, मुखपट्टी लावणे अत्यावश्यक करण्यात आले. आम्हाला कठोर पावले उचलायची आहेत, कारण, या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडायचे आहे, असे दक्षिण ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्टीव्हन मार्शल यांनी जाहीर केले. राजधानी ऍडलेडयेथे एका हऑटेलमध्ये 23 जणांना बाधा झाली. या ह्ऑटेलच्या सफाई अधिकाऱ्याने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारन्टाईनची व्यवस्था केली होती. त्यातून कोरोनाची साथ प्रवाशात पसरली.  मार्शल म्हणाले, हे दुष्टचक्र आम्हाला मोडून काढावेच लागेल. प्रवाशांना 24 तासाताच कोरोना झाला. नजिकच्या व्हिक्टोरिया राज्यात कोरोना इतका वेगाने पसरला, की मेलबोर्नमध्ये तीन महिने टाळेबंदी करण्यात आली. 

हे वाचा - Coronavirus : कोरोना संसर्गाचे एक वर्ष

दिल्लीवर तर दुहेरी संकट कोसळले आहे. दर हिवाळ्यात प्रदूषणामुळे दिल्ली गुदमरते. त्यामुळे, मुखपट्टी लावण्याची दिल्लीकरांना सवय झाली आहे. दुसरे, कोरोनाचे संकट दूर होण्याची शक्यता दिवसेदिवस कमी होत चालली आहे. कोरोनाची बाधा हे न्यू न्ऑर्मल ठरत आहे. 

बुधवारी प्रसिद्ध झालेल्या बातम्यात देशातील आठ महानगरात कोरोना वेगाने पसरत असून, त्यात दिल्ली व्यतिरिक्त कोलकता, सूरत, अहमदाबाद, बेंगालूरू, चेन्नई, पुणे व मुंबई यांचा समावेश आहे. पुण्याचा पहिला क्रमांक आहे. तिथं बाधा झालेल्यांची संख्या 51,857 आहे. पुण्याच्या खालोखाल बेंगलूरू, मुंबई व दिल्लीचा क्रमांक लागतो. 

गेल्या दोन दिवसापासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बैठकावर बैठका घेत असून, सरकारतर्फे काय उपाय योजले जात आहेत, याची माहिती देत आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया व आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी टाळेबंदीची शक्यता नाकारली. घराबाहेर व सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी अत्यावश्यक करण्यात आली असून, तिचा वापर न करणाऱ्यास 2000 रू दंड ठोठावण्याची घोषणा केली. आधी हा दंड 500 रू होता. अनुभव असा आहे, की केवळ दंडाची रक्कम वाढवून काही होणार नाही. कारण, या नियमाची अमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे यंत्रणाच नाही. 

हे वाचा - Corona Vaccine: 'ऑक्सफर्डची लस एप्रिलमध्ये, दोन डोसची किंमत असणार 1000 रुपये'

दिवाळीत, दिल्लीत प्रदूणत रोखण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. तिचे पालन झाले नाही. त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. किती लोकांना सरकारने दंड केला, याची काहीही माहिती प्रसिद्ध झालेली नाही. ग्रीन फटाके उडविण्यास परवानगी होती. पण, उडविलेले फटाके खऱच ग्रीन होते, की नाही, हे कुणी पाहिले नाही. दिवाळीच्या दिवसात सामाजिक अंतराचा नियम राजरोसपणे मोडण्यात आला. साऱ्या बाजारपेठात लोक मुखपट्टी न घालता फिरत होते. त्यातून कोरोनाची लागण किती लोकांना झाली असेल ठाऊक नाही. दरम्यान, दिल्लीतील कोरोनाबाधिंताचा आकडा रोज वर जातोय. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 98 लोक दगावले. कोरोनामुळे दिल्लीत झालेल्या मृत्यूंचा एकूण आकडा 8041 झाला आहे. त्यामुळे, दिल्ली सरकारमध्ये एक प्रकारची पॅनिक असून, कोरोना केव्हा, कुणाच्या व कोणत्या स्वरूपात समोर उभा राहील, याबाबत कुणीही खात्री देऊ शकत नाही.   

बिहाराचा छट महोत्सव साजरा करण्यासाठी यमुनेच्या तीरावर घाट बांधण्यात आलाय. तिथं या दिवसात तुंबळ गर्दी जमते. ती गर्दी सरकार थांबवू शकणार नाही. कारण, त्यात राजकारण आहे. बिहारमध्ये भाजप-जदयूचे सरकार आल्याने महोत्सव थांबविणे, म्हणजे मतदारांची नाराजी ओढवून घेणे होय. उलट, दिल्लीत दर वर्षी धूमधडाक्याने साजरे होणारे गणेशोत्सव व कालीपूजा हे दोन्ही सण यंदा संयम दाखवून लोकांनी स्वतः हून साजरे केले नाही. गेल्या हिवाळ्यात प्रदूषण वाढले, म्हणून ऑड एंड इव्हन ही वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. डिसेंबर व जानेवारीमध्ये पुन्हा तिची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केजरीवाल सरकार नियमपालनाबाबत धरसोडीची भूमिका घेत आहे, याबाबत उच्च न्यायालयाने सरकारला फैलावर घेतले व निर्णय घेण्यात झालेल्या 18 दिवसांच्या दिरंगाईने अऩेकांवर कोरोनाचे संकट कोसळले, असे म्हटले आहे. 

Corona Updates: देशातील बाधितांचा आकडा 90 लाखांच्या वर

अमेरिकेत कोरोनावरून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्यात रोज खटके उडत आहेत. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी 20 लाख 70 हजार 712 व मृत्यू 25 लाख 8333 झाले आहेत. मिशिगन व वॉशिंग्टन राज्यात कठोर उपाययोजना करण्यात आली असून संगीतगृहे, कॅसिनो, सिनेमागृहे, स्केटींग रिंक्स व तत्सम खेळांवर बंदी घालण्यात आली. घरातील समारंभाला दहापेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहाण्यास मनाई आहे.  

आशिया-प्रशांत महासागर परिसरातील देशातील स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. ज्या दक्षिण कोरियाने कोरोनाची स्थिती उत्तमपणे हाताळली होती, तो देश आता क्रिटिकल क्रऑसरोडस् च्या उंबरठ्यावर आहे. रोज 200 रुग्णांची वाढ होत आहे. दुसरीकडे, आणिबाणी जाहीर करावी, असा दबाब जपानचे नवे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्या सरकारवर आला आहे. दक्षिणपूर्व आशियातील इंडोनेशियात कोरोनाबाधितांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यात रोज 5444 रुग्णांची भर पडते आहे.   

हे वाचा - भावा मला माफ कर, पण तेवढा मास्क घाल बघू
      
ब्रिटनचे पंतप्रधान बऑरिस जॉनसन, आय अय़ाम फिट एज बुचर्स डॉग, असे भले म्हणोत, पण कोरोनापाई त्यांच्या दोन सहकाऱ्यांना रूग्णालयात दाखल व्हावे लागले. ब्रिटन न युरोप कोरोनाच्या संकटातून बाहेर आलेले नाहीतच, उलट कोरोनाची दुसरी लाट पुन्हा पसरतेय का, ही धास्ती युरोपला पडली आहे. 

कोरोनाच्या संदर्भात प्रतिदिन क्षणाक्षणाला आकडेवारी जाहीर करणाऱ्या वर्लडोमीटरनुसार त्याचा प्रादुर्भाव झालेल्या पहिल्या दहा देशांचा अनुक्रम अमेरिका, भारत, ब्राझील, फ्रान्स, रशिया, स्पेन, ब्रिटन, अर्जेंटीना, इटली व कोलंबिया असा आहे. जगातील एकूण 220 देश, प्रदेश, स्वतंत्र बेटे यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 5 कोटी 72 लाख, 54,539 झाली आहे. यावरून प्रत्येक देशापुढे असलेल्या आव्हानाची कल्पना येते.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran journalist vijay naik blog on corona worldwide situation