
Alien mock signal from Mars to Earth : मंगळावरून पृथ्वीवर मिळाला सांकेतिक संदेश
पॅरिस : ‘अंतराळात कोणीतरी आहे’, या औत्सुक्यातून मानव अंतराळातील परग्रहवासींचा (एलियन) शोध घेत आला आहे. पृथ्वीवरील मानवाप्रमाणे अन्य ग्रहांवरील सजीवांचा शोध घेण्यासाठी जगभरातील विविध अवकाश संशोधन संस्था अवकाश मोहिमांचे आयोजन करीत असतात. अशा कोणाशी संपर्क झाला तर, कसा प्रतिसाद द्यायचा? याचा सराव प्रथमच करण्यात आला आहे.
युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने (ईएसए) हा प्रयोग केला असून त्यासाठी मंगळावरून संदेश पाठविण्यासाठी ‘अएक्झोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटर’चा (टीजीओ) वापर केला. ‘ए साइन इन स्पेस’ या मोहिमेचे नाव आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर फिरणाऱ्या या यानाने २४ मे रोजी रात्री नऊ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सांकेतिक भाषेतील संदेश पाठविला होता. हा संदेश रेडिओ लहरींद्वारे पृथ्वीवर पोहोचला असून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात आहेत.
‘‘मानवाच्या इतिहासात शक्तिशाली आणि परिवर्तनीय घटनांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. पृथ्वीबाहेरील संस्कृतीकडून संदेश येणे हा सर्व मानवजातीसाठी एका स्थित्यंतराचा अनुभव असेल,’’ असे या मोहिमेचे शिल्पकार डॅनियल डी पॉलिस म्हणाले.
‘ईएसए’चे अवकाशयान २०१६ पासून मंगळाच्या पृष्ठभागापासून ४०० किलोमीटर वरून फिरत आहे. तेथील संभाव्य जैविक किंवा भूवैज्ञानिक हालचालींचा मागोवा हे यान घेत आहे, अशी माहिती अधिकारी टियागो लॉरेईरो यांनी दिली.
जर्मनीच्या डार्मस्टॅट येथील अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाकडे हा संदेश प्रथम पाठवण्यात आला होता, असे ‘ईएसए’च्या संकेतस्थळावर साठविण्यात आला. नंतर या संदेशाचे स्वयंचलित प्रक्षेपण करण्यात येऊन तो पृथ्वीकडे परत आला.
या संदेशाचे रूपांतर करुन त्याचा अर्थ लावण्याचे आवाहन सर्व देशांतील नागरिकांना आणि तज्ज्ञांना केले आहे. संदेशातील मजकूर कुलूपबंद ठेवण्यात येणार आहे. ज्यांनी या संदेशाचे रूपांतर केले आहे त्यांनी त्याचा अर्थ काय आहे याचे स्पष्टीकरण ‘ईएसए’कडे सादर करण्यास सांगितले.
मंगळ ते पृथ्वी १६ मिनिटांत
कॅलिफोर्नियातील ‘सेटी इन्सिट्यूट’ या संस्थेतील वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ फ्रँक मार्चिस म्हणाले, की ही परग्रहावरील संदेशाचे रूपांतर करण्याची पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न आम्ही अनेक वर्षांपासून करीत होतो. वास्तवात संदेश प्राप्त करणे आणि त्याचा अर्थ कसा लावला जाईल, याची कल्पना आम्ही केली नव्हती.
रोमचे डॅनिएला डी पॉलिस यांनी ‘ए साइन इन स्पेस’ नावाने एक मोहीम सुरू केली होती. २४ मे रोजी रात्री नऊ वाजता मंगळाच्या कक्षेत फिरत असलेल्या ‘टीजीओ’ने एक संदेश पाठविला. पृथ्वी आणि मंगळामधील अंतर ३० कोटी किलोमीटर एवढे आहे. यामुळे हा संदेश पृथ्वीवर पोहोचण्यास १६ मिनिटे लागली, असे ‘ईएसए’ने सांगितले.