Coronavirus : अमेरिका-फ्रान्सलाही धक्का

न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसमुळे शहरात सोमवारी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यापूर्वी काही कर्मचारी कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे ग्रँड सेंट्रल टर्मिनलजवळ वर्दळ झाली होती.
न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसमुळे शहरात सोमवारी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यापूर्वी काही कर्मचारी कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे ग्रँड सेंट्रल टर्मिनलजवळ वर्दळ झाली होती.

वॉशिंग्टन - इटली, स्पेनबरोबरच कोरोना विषाणूने अमेरिका आणि फ्रान्सलाही चांगलाच झटका दिला असून, या दोन्ही देशांमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कालप्रमाणे (ता. २२) आजही इटलीमध्ये एकाच दिवशी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून, आज येथे ६५१ जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. जगभरात मृतांच्या संख्येने पंधरा हजारांचा टप्पा गाठला आहे.

युरोप हा कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू ठरला असून येथील ब्रिटन, स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स यांसारख्या देशांमध्ये कोरोनामुळे ‘लॉकडाउन’ची वेळ आली आहे. कोरोनाशी लढण्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचे सांगणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गग्रस्तांची संख्या ३३ हजारांच्या वर गेली असून बळींच्या संख्येनेही चारशेचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशभरात सुमारे चार हजार विशेष वैद्यकीय केंद्र उभारण्याचा आदेश प्रशासनाला दिला आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्निया या ठिकाणी अधिक काळजी घेतली जात आहे.

संसर्गाचा प्रसार रोखण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प आशावादी असून त्यासाठी सरकार काहीही करण्यास तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली आहे. फ्रान्समध्ये एकाच दिवशी बळींचा आकडा ११२ ने वाढला असून देशात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६७४ झाली आहे. येथे एकूण १६ हजारांहून अधिक बाधित रुग्ण आहेत. तसेच, बाधित रुग्णांच्या संख्येबाबत हा केवळ अंदाज असून अद्यापही अनेक लोकांची चाचणी केली गेलेली नाही. लोकांनी अद्यापही ही बाब पुरेशा गांभीर्याने घेतली नसल्याने दरदिवशी बाधितांची आणि मृतांची संख्या वाढतच आहे, असे येथील सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. फ्रान्समध्ये गेल्या आठवड्यापासून लॉकडाउन आहे. 

न्यूयॉर्कमध्ये लष्कर शक्य
न्यूयॉर्क - संसर्ग कमी करण्यासाठी न्यूयॉर्क शहर पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा विचार स्थानिक प्रशासनाने सुरू केला आहे. लोकांना मास्क, औषधे आणि इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी लष्कराची मदत घेण्याबाबत येथील महापौरांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली आहे. अध्यक्षांनी आताच निर्णय दिला नाही, तर लोकांना जीव गमवावा लागेल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे. या विषाणूचा देशात उद्रेक होण्यापासून आपण केवळ १० दिवस दूर असून असे झाल्यास मृतांच्या संख्येत प्रचंड वाढ होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे चारशेच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील ११४ जण एकट्या न्यूयॉर्कमधील आहेत. संसर्गग्रस्तांची संख्याही न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक १५ हजार आहे.

इटलीमध्ये बळींची संख्या ५,४७६
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला असून या देशात एकाच दिवसात बळी पडणाऱ्यांची संख्या गेले तीन दिवस पाचशेच्या वरच आहे. आजही येथे एकाच दिवशी ६७१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ५,४७६ झाली आहे. इटलीमध्ये संसर्गग्रस्त आणि बळींची संख्या वाढतच असल्याने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असूनही सरकार हवालदिल झाले आहे. इटलीमध्ये बाधितांची संख्या साठ हजारांच्या जवळ पोहोचली आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरची सर्वांत भयानक परिस्थिती अनुभवत असल्याची प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान गिसेप कॉन्ते यांनी दिली आहे.

नेपाळ-भारत सीमा बंद
काठमांडू : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नेपाळने भारत आणि चीनबरोबरील त्यांची सीमा आजपासून सात दिवसांसाठी बंद केली आहे. सीमांवरून होणारी प्रवासी वाहतूक बंद केली असली, तरी मालवाहतूक सुरूच राहणार आहे. नेपाळने ३१ मार्चपर्यंत बाहेरील देशांमधून येणाऱ्या विमानांनाही बंदी केली आहे. नेपाळमध्ये कोरोनाचा संसर्ग फार नसला, तरी त्यासाठी सज्ज राहत सरकराने तयारी सुरू केली आहे.

अँजेला मर्केल एकांतवासात
बर्लिन : जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल या एकांतवासात गेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची भेट झालेल्या एका डॉक्टरला संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. जर्मनीमध्ये बाधितांची आणि मृतांची संख्या वाढत असल्याने जर्मन सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. मर्केलही पुढील काही दिवस घरूनच काम करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com