येणार कोरोनाची लस येणार; जाणून घ्या भारतासह जगातील लशींच्या संशोधनाचं 'स्टेटस'

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 October 2020

जगासह भारतामध्ये कोविडवरील लस निर्माण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. यातील आघाडीवर असणाऱ्या लशींचे काम कुठंपर्यंत आलं आहे हे आपण पाहुया...​

जगात आणि देशभरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूवर प्रभावी आणि सुरक्षित लस केव्हा येईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रशिया आणि चीनमध्ये प्रायोगिक तत्वावर लस देणे सुरु करण्यात आले आहे. मात्र, जागतिक स्तरावर या दोन्ही देशांच्या लशींचा अस्विकार करण्यात आला आहे. दुसरीकडे जगासह भारतामध्ये कोविडवरील लस निर्माण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. यातील आघाडीवर असणाऱ्या लशींचे काम कुठंपर्यंत आलं आहे हे आपण पाहुया...

भारत बायोटेक

भारताची स्वदेशी लस कोवॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेक (BHARAT BIOTECH) कंपनी करत आहे. कोवॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरु होणार आहे. कंपनी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्यासाठी भारतीय नियामक मंडळाकडे परवानगी मागितली आहे. डीसीजीआयने (DCGI) कंपनीला दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती देण्यास सांगितले आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या परिणामांचे परिक्षण केल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी दिली जाईल. तिसऱ्या टप्प्यात 28,500 स्वयंसेवकांना लस देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

चीनला मोठा झटका; डिल मोडून यूरोपीय देशाचा अमेरिकेसोबत आण्विक करार

मॉडर्ना

अमेरिकेची फार्मा कंपनी मॉडर्ना (Moderna) लस निर्मितीच्या कामात प्रगतीपथावर आहे. मॉडर्नाची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. यात 30 हजार स्वयंसेवकांना लस देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने गुरुवारी एक मोठी घोषणा केली. कंपनीने आपल्या कोविड लशीला पेटेंटमुक्त केले आहे. त्यामुळे अन्य कंपन्याही मॉडर्नाची कोरोना लस तयार करु शकणार आहेत. पुढील वर्षी जानेवारीपर्यंत लस तयार होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, 25 नोव्हेंबरनंतर मॉडर्नाची लस आणीबाणीसाठी वापरली जाऊ शकते. कारण तोपर्यंत पुरेसा डाटा आपल्याला मिळालेला असेल, असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे.  

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका

टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लशीला यूकेमध्ये ख्रिसमसपर्यंत नियामक मंडळाची परवानगी मिळू शकते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. लशीपासून चांगले परिणाम दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे. 9 सप्टेंबरला लशीची चाचणी थांबवण्यात आली होती. एक स्वयंसेवक अचानक आजारी पडला होता. स्वतंत्र परिक्षण केल्यानुसार 12 सप्टेंबरला चाचणी पुन्हा सुरु करण्यात आली. 

भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीची निर्मिती करत आहे. कंपनीने पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु केली आहे. 2021 च्या सुरुवातीला कोरोना लस तयार होईल, असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

जॉनसन अँड जॉनसन

जॉनसन अँड जॉनसन कंपनीने मागील महिन्यात तिसऱ्या टप्यातील मानवी चाचणीला सुरुवात केली. या लशीचा एक डोस 60 हजार स्वयंसेवकांना देण्यात आला आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा 2021 च्या सुरुवातीला याचे परिणाम येतील असं सांगण्यात आलं आहे. सकारात्मक परिणाम मिळाल्यास आणीबाणीसाठी याचा वापर सुरु केला जाऊ शकतो. जॉनसन अँड जॉनसनने 2021 पर्यंत 100 कोटी लस निर्माण करण्याचे लक्ष ठेवले आहे. जॉनसन अँड जॉनसन लशीचा केवळ एक डोस शरीरात पुरेसे अँटिबॉटी तयार करण्यास सक्षम आहे. 

कोणत्या महिन्यापासून लस मिळेल

कोरोना लस कोणत्या महिन्यापासून सर्वांना मिळू लागेल, याबाबत निश्चित असं सांगता येणार नाही. मात्र, 2021 मधील मार्च आणि एप्रिल महिन्यात लस सर्वांना मिळू शकेल, असा अंदाज लावण्यात येत आहे. असे असले तरी आणीबाणीच्या वापरासाठी या वर्षाच्या शेवटापासूनच मिळणार आहे.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine bharat biotech moderna johnson and johnson Oxford AstraZeneca