Coronavirus:चीनमध्ये कोरोना चेकपोस्टवर तपास अधिकाऱ्यांवर हल्ला; तरुणाला थेट मृत्यूदंड

टीम ई-सकाळ
सोमवार, 2 मार्च 2020

चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. या व्हायरसची लागण झालेल्या तीन हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

बीजिंग Beijing Coronavirus:चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. या व्हायरसची लागण झालेल्या तीन हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचा धोका वाढल्यामुळं चीनमधील लोकांमध्ये धास्ती आहे. कोरोनाग्रस्त शहरांवर चेक पोस्ट लावण्यात आले असून, कोरोनाची लागण झालेल्यांना त्या शहराच्या बाहेर प्रवेश दिला जात नाही. अशाच एका चेक पोस्टवर झालेल्या वादावादीतून एकाने दोन अधिकाऱ्यावर भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्याची गंभीर दखल चीनमधील कोर्टाने घेतली असून, संबंधित तरुणाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनमध्ये भीषण परिस्थिती 
चीनमध्ये सध्या 80 हजार जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत या व्हायरसने 3 हजार जणांचा बळी घेतला आहे. या व्हायरसमुळे चीन सरकारने विविध शहरांच्या बाहेर चेक पोस्ट उभे केले असून, त्या ठिकाणी नागरिकांचा ताप आहे की नाही याची तपासणी केली जाते. चीन सरकारने प्रवास करण्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ सरकारच नव्हे तर, अनेक गावांनी आणि समुदायांनी अशा प्रकारे चेक पोस्ट उभे करून, व्हायरसचा आणखी फैलाव होणार नाही, यासाठी दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. 

आणखी वाचा - कोरोना दिल्लीत धडकला, भारतात आणखी दोन रुग्ण आढळले

काय घडले होते?
एका गावाच्या वेशीवर उभारण्यात आलेल्या एका चेक पोस्टवर तपासणी करणारे अधिकारी आणि एका 23 वर्षीय तरुणात वाद झाला. दक्षिण चीनमधील युनान प्रांतत असणाऱ्या होंगेई येथील लौ मेंग या गावाबाहेरच्या चेक पोस्टवर हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार 6 फेब्रुवारीला घडला असून, त्यानंतर त्या तरुणावर कोर्टात खटला चालवण्यात आला. त्यात कोर्टाने त्या तरुणाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. मा जिएनगौ, असं शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव आहे. मा याने चेक पोस्टवर तपासणीला नकार देत अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती. त्यानंतर त्याने एका अधिकाऱ्याच्या छातीत सुरा खूपसला होता.  त्या अधिकाऱ्याच्या मदतीला आलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यावर त्यानं हल्ला केला होता. कोर्टात मा याने आपला गुन्हा कबूल केला होता, अशी माहितीही देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus china one person got death sentence for stabbing medical office check post