लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या नाहीत; EMA कडून एस्ट्राझेनकाला क्लीनचीट

astrazenca vaccine europe
astrazenca vaccine europe

पॅरिस - युरोपियन मेडिसिन एजन्सीने क्लिनचीट दिल्यानंतर युरोपातील देशांनी पुन्हा एकदा एस्ट्राझेनका ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्याची तयारी केली आहे. युरोपातील देशांनी म्हटलं की, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड, जर्मनी, इटली, फ्रान्स, लात्विया, लिथुआनिया आणि सायप्रससह इतर देशांमध्ये लवकरच लसीकरण सुरु होईल. तर अजुनही आयर्लंड आणि स्वीडनमध्ये परिस्थितीची समीक्षा केल्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे. याआधी ईएमएने गुरुवारी एस्ट्राझेनकाच्या कोरोना लसीला क्लिनचीट दिली होती. त्यात म्हटलं होतं की, एस्ट्राझेनकाच्या तपासामध्ये लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं आढळलं आहे. लस घेणाऱ्या काही लोकांच्या रक्तात गाठी आढळल्याचं समोर आल्यानंतर युरोपातील अनेक देशांनी लसीकरण थांबवलं होतं. ईएमएचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर एमर कूक यांनी सांगितलं की, एजन्सीच्या फार्माकोविलिजन्स रिस्क असेसमेंट कमिटीने केलेल्या तपासात लस सुरक्षित असल्याचं आढळलं आहे. तसंच यामुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याचा काहीएक संबंध नाही. 

अनेक देशांमध्ये लस घेतलेल्या लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी सुरु होती. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्याबाबतच्या रिपोर्टनंतर आठवड्याच्या सुरुवातीला जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि इटलीसह 12 देशांनी एस्ट्राझेनकाच्या लसीचा वापर थांबवण्यात आला होता. यामुळे जगभरात एस्ट्राझेनकाच्या लशीचा वापर करणाऱ्या देशांनीसुद्धा धास्ती घेतली होती.

लसीकरण थांबवणं योग्य नाही
एस्ट्राझेनका आणि जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं होतं की, याबाबत कोणतेही पुरावे नाहीत की लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. ईएमएनेसुद्धा लसीचं समर्थन करताना म्हटलं होतं की, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता लसीकरण थांबवणं योग्य नाही. 

जगातील कोरोना रुग्णांची संख्या 12 कोटींवर
जगातील एकूण रुग्णांची संख्या 12 कोटींच्या वर पोहोचली आहे. सध्या ही आकडेवारी 12 कोटी 23 लाखांच्यावर आहे. गेल्या 24 तासात 5 लाख 41 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. 10 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 9 कोटी 86 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 27 लाखांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जगात सक्रीय रुग्णांची संख्या 2 कोटी 10 लाखांपेक्षा जास्त आहे. 

भारतात काय परिस्थिती?
भारतात बुधवारी 24 तासांत कोरोनाचे नवे 35 हजार 871 रुग्ण आढळले होते. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 14 लाख 74 हजार 605 वर पोहोचली आहे. बुधवारी 17 हजार 741 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत जवळपास 1 कोटी 10 लाख 63 हजार 025 वर पोहोचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com