कोरोनाचा मोठा फटका सहन केलेल्या इटलीचा हा आलेख जगासाठी दिलासादायक!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 मे 2020

21 फेब्रुवारीला इटलीच्या लोंबाडी परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर कोरोनाने याठिकाणी अक्षरश: मृत्यूचे तांडव केल्याचे पाहायला मिळाले.

रोम :  चीनच्या वुहानमधून जगभरात वेगाने संक्रमण झालेल्या कोरोना विषाणूने युरोपातील इटलीत अक्षरश: हाहाकार माजवला होता. आरोग्य सुविधेच्या बाबतीत अग्रसर असलेल्या इटलीची अवस्था पाहून कोरोनामुळे इतर राष्ट्रांचे काय होईल? अशी धास्तीही निर्माण झाली होती. मात्र आता इटलीतून आशादायी वृत्त येण्यास सुरुवात झाली आहे. 21 फेब्रुवारीला इटलीच्या लोंबाडी परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर कोरोनाने याठिकाणी अक्षरश: मृत्यूचे तांडव केल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला इटली यातून सावरले असून कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. हजाराच्या घरात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून इटलीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 60 हजार 960 वर आलाय.  

जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मिळाली मोठी जबाबदारी
 

सिन्हुआ वृतसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, उपचारानंतर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये मोठी सुधारणा दिसत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा 1 लाख 34 हजार 560 इतका झाला आहे. मागील 24 तासात इटलीमध्ये 156 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. आतापर्यंत 2 लाख 28 हजार 06 कोरोनाग्रस्तांपैकी 32 हजार 486 जणांचा मृत्यू झाला आहे. 

दोन महिन्यानंतर दिल्ली पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी 640 रुग्णांवर  अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. बुधवारी हा आकडा 676 होता. कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे जवळपास 9 हजार 269 लोक रुग्णालयात दाखल आहेत. मागील 24 तासाच्या तुलनेत हा आकडा 355 नी कमी आहे. कोविड-19 संक्रमण चाचणीमध्ये पॉझिटीव्ह आढळलेली 84 टक्के लोकांमध्ये हलक्या स्वरुपाची लक्षणं असल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. हा आकडा जवळपास 51 हजारच्या घरात आहे. एकंदरीत इटलीमधील तीन महिन्यानंतर कोरोनाबाबत होणाऱ्या सुधारणेची आकडेवारी जगाला दिलासा देणारी अशीच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 Reduction in cases after three months in Italy