खरंच! कोलकाता ते लंडन धावायची बस, 8 हजार किमी असायचा प्रवास

ई सकाळ
Wednesday, 8 July 2020

एक काळ होता जेव्हा भारतातून लंडनला बस जायची. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा बससेवेवर परिणाम होऊ नये यासाठी कंपनीने खास सोयही केली होती.

नवी दिल्ली - भारतातून इंग्लंडला विमानाने किंवा समुद्रमार्गे प्रवास केला असं कोणी सांगितलं तर यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही. पण हाच प्रवास जर एका बसमधून केला जायचा आणि अशी बस सेवाही सुरू होती असं सांगितलं तर एखाद्याला वेड्यात काढाल. पण हे खरं आहे. एक काळ होता जेव्हा भारतातून लंडनला बस जायची. पृथ्वीचा व्यास 12 हजार 742 किमी इतका आहे. तर कोलकाता ते लंडन हे अंतर 7 हजार 957 किमी. म्हणजेच पृथ्वीला अर्ध्यापेक्षा जास्त फेरी ही बस मारत होती.

अल्बर्ट असं नाव असलेली बस पहिल्यांदा लंडनमधून 15 एप्रिल 1957 ला निघाली होती. भारतात कोलकात्यात ही बस प्रवाशांना घेऊन 5 जून 1957 ला पोहोचली. जवळपास 45 दिवसांचा हा प्रवास होता. सोशल मीडियावर सध्या या बसचे आणि तिकिटाचे फोटो व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोंवरून आणि स्टोरीवरून अनेकांना हे खरं आहे का असाही प्रश्न पडला. मात्र ही गोष्ट खरी आहे. त्यावेळी भारतातील काही पेपरमध्येही याबाबतची बातमी आली होती. लंडन ते कोलकाता अशी बससेवा देण्याचं काम सिडनीतील एक टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी करत होती. बसची लंडनमधून निघण्याची आणि भारतात पोहोचण्याची तारीख आधीच ठरलेली असायची. लंडन ते कोलकाता असा प्रवास करताना अनेक देशांमधून ही बस यायची. अशावेळी वाटेत एखाद्या पर्यटनस्थळी थांबून प्रवाशांना फिरण्याचाही आनंद लुटता यायचा.

Did you know about the Calcutta London bus service? The bus travelled between the two most important cities in British...

Posted by Kolkata bus-o-pedia on Saturday, 27 June 2020

लंडनला जाणाऱ्या या बसला मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत होता. कोलकात्यातून बस निघाली की ती दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात जात असे. तिथून लाहोर, काबूल, अफगाणिस्तानमधील हैराण, इराणमधील तेहरान, तुर्कस्तानातील इस्तांबुल, बुल्गारिया, युगास्लाव्हिया, ऑस्ट्रिया, जर्मनी, बेल्जियम असा प्रवास करत लंडनला पोहोचत होती. तिथून परत याच मार्गाने येताना दिल्लीत आल्यानंतर आग्रा, अलाहाबाद, बनारस मार्गे कोलकात्याला पोहोचत असे.

हे वाचा - एक देश ज्याने 6 दिवसात चार देशांना चितपट केले होते

इतक्या लांबचा प्रवास कंटाळवाणा होणार नाही याचीही काळजी कंपनीने घेतली होती. 45 ते 50 दिवसांच्या या बस प्रवासामध्ये प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी रेडिओसुद्धा होता. याशिवाय फॅन हिटर, झोपण्यासाठी वेगळी सुविधा होती. प्रवास आरामदायी आणि आठवणीत राहणारा व्हावा याची पूर्ण खबरदारी कंपनी घेत होती.

1972 मध्ये कोलकाता ते लंडन प्रवासासाठी बसचं तिकिट 145 रुपये इतकं होतं. आजच्या तुलनेत रुपयांमध्ये हेच भाडं 13 हजार 644 रुपये एवढं होतं. यामध्ये बसचा प्रवास, नाश्ता, जेवण आणि बस ज्या ठिकाणी थांबायची तिथं राहण्याची व्यवस्था यांचा समावेश होता. लंडनला जाण्यासाठी कोलकात्यामध्ये वेगवेगळ्या भागातून लहान बसमधून लोक यायचे.

हे वाचा - प्राचीन काळी धूम्रपानासाठी वेगळ्याच प्रजातीचा वापर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा बससेवेवर परिणाम होऊ नये यासाठी कंपनीने खास सोयही केली होती. बसचं तिकीट कालांतराने 305 डॉलर इतकं करण्यात आलं होतं. या तिकिटावर एक सूचनाही लिहिण्यात आली होती. जर भारत-पाक सीमा बंद झाली तर प्रवाशांना पाकिस्तानवरून विमानाने नेण्यात येईल. त्यावेळी आगाऊ भाडे द्यावे लागेल असंही यामध्ये नमूद करण्यात आलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: culcutta to london bus service in 1970 social media viral photo