वैयक्तिक सूडभावनेतून मृत्युदंडाची शिक्षा - परवेझ मुर्शरफ

पीटीआय
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

‘मुशर्रफ यांना भारतीय नागरिकत्व द्या’
नागरिकत्व कायद्याविरोधात संपूर्ण देशात वातावरण तापलेले असतानाच भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी परवेझ मुशर्रफ यांना भारतीय नागरिकत्व देण्यात यावे, असे उपरोधिक विधान आज केले. स्वामी यांनी याबाबत ट्‌विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा तेथे छळ केला जात आहे, हे पाहता आपण त्यांना तातडीने भारतीय नागरिकत्व देऊ शकतो. याचे कारण म्हणजे, मुशर्रफ हे पूर्वी दरियागंजमध्ये राहत होते. स्वतःला हिंदूंचे वंशज मानणाऱ्या सर्व व्यक्ती नव्या नागरिकत्व कायद्यानुसार भारतीय नागरिकत्वासाठी पात्र ठरतील.

इस्लामाबाद - ‘पाकिस्तानी न्यायालयाने देशद्रोहाबद्दल सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा ही वैयक्तिक सूडभावनेने दिली आहे, असा आरोप पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख, अध्यक्ष आणि हुकूमशहा परवेझ मुर्शरफ यांनी बुधवारी (ता. १८) केला. शिक्षेच्या सुनावणीनंतर मुशर्रफ यांनी काल प्रथमच प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुशर्रफ यांना न्यायालयाने मंगळवारी (ता. १७) देशद्रोहाबद्दल मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, या निर्णयाला पाकिस्तानी सैन्याने विरोध दर्शविला आहे.  
निकालानंतर मुशर्रफ यांच्या समर्थकांनी देशाच्या विविध भागांत छोटे मोर्चे काढले होते. मुशर्रफ यांच्या पक्षातर्फे प्रसारित केलेल्या व्हिडिओत त्यांनी न्यायालयाचा निकाल सूडबुद्धीने घेतला असल्याचे म्हटले आहे. ‘अशा निर्णयाचे कोणतेही उदाहरण नसेल; ज्यात प्रतिवादीला आणि त्याच्या वकिलालाही आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली नाही. न्यायालयाने २०१४ ते २०१९ या कालावधीत माझ्यावर खटल्याची सुनावणी घेण्यात आली. त्या काळात वैद्यकीय उपचारांसाठी मी देश सोडून दुबईत राहत होतो. तेथे माझा जबाब नोंदविण्याची विनंती धुडकावण्यात आली,’ असेही ते म्हणाले.

देशभर जनक्षोभ; पोलिसांची धरपकड सुरूच!

‘‘न्यायालयाच्या या निकालावर अनेक प्रश्‍नचिन्ह आहेत आणि त्यात कायद्याचे पालन केलेले नाही. या प्रकरणात घटनेनुसार सुनावणी घेण्याची काही आवश्‍यकता नव्हती. मात्र, तरीही सुनावणी घेण्यात आली. कारण, काही लोकांच्या मनात माझ्याबद्दल सुडाची भावना आहे आणि एका व्यक्तीने मला यात फशी पाडले आहे, असा आरोप मुशर्रफ यांनी केला.

देशभरात हिंसाचाराच्या घटना : वाचा दिवसभरात कोठे काय घडले!

कोणाचाही उल्लेख न करता ते म्हणाले की, ज्यांनी माझ्याविरोधात कारवाई केली आहे, ते उच्च पदाचा लाभ घेत असून, त्यांनी त्याचा दुरुपयोग केला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर समर्थक व पाकिस्तानचे सैन्य पाठीशी उभे राहिल्याबद्दल मुशर्रफ यांनी सर्वांचे आभार मानले. वकिलांशी चर्चा केल्यानंतरच भवितव्याविषयी निर्णय घेऊ. आपल्याला न्याय मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मुर्शरफ यांच्या वतीने शिक्षेला आव्हान देण्यात येणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, मुशर्रफ यांना शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली परिस्थिती कशी हाताळायची, यावर पंतप्रधान इम्रान खान यांनी आज त्यांच्या सल्लागारांशी चर्चा केली. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रत्यार्पण करार झालेला नाही आणि अमिरातीमधील अधिकारी त्यांना अटक करण्याची शक्‍यता कमी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death penalty for personal indecency pervez musharraf