esakal | ...अन्यथा भारताला परिणामांना सामोरे जावे लागेल; चीनची पुन्हा आगळीक
sakal

बोलून बातमी शोधा

india vs china

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सीमेवरुन तणावाची स्थिती आहे. चीनने दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या स्थितीवर भाष्य केलं आहे.

...अन्यथा भारताला परिणामांना सामोरे जावे लागेल; चीनची पुन्हा आगळीक

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सीमेवरुन तणावाची स्थिती आहे. चीनने दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या स्थितीवर भाष्य केलं आहे. दोन्ही देशांनी गलवान खोऱ्यातील तणाव कमी करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. उभय देशांनी गलवान खोरे आणि इतर भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशातील स्थिती सुधारत आहे, असं चीनने म्हटलं आहे.  

चीनच्या म्हणण्यानुसार, ज्या भागात वादाची स्थिती आहे त्या भागातून दोन्ही देशाच्या सैन्याने माघार घेण्याचे मान्य केले आहे. मात्र, चिनी राज्य मीडिया वारंवार भारतावर टीका करत आक्रमकपणा दाखवत आहे. भारताने उभय देशात झालेला करार मोडू नये आणि भारतीय सैन्याने सीमेपासून दूर रहावे. भारताने कराराचे उल्लंघन केल्याचे त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात, असा धमकीवजा इशारा चिनी माध्यमांकडून देण्यात येत आहे. चिनी माध्यमे हे सरकार पुरस्कृत असतात, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला विशेष महत्व आहे.

South Korea :बेपत्ता महापौरांचा मृतदेह झाडीत सापडला; अध्यक्षपदाचे होते प्रबळ दावेदार

भारत आणि चीनच्या सैनिकांमघ्ये 15 जून रोजी पूर्व लडाखमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. तर चीनने आपली जीवितहानी जाहीर करण्यास नकार दिला होता. चीनच्या या कृतीमुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट आहे. भारत सरकारने चीनला धडा शिकवण्यासाठी कंबर कसली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील स्थिती अत्यंत स्फोटक बनली. उभय देशांनी सीमा भागात सैनिकांची मोठ्या प्रमाणात आवक केली. तसेच शस्त्रास्त्र उपकरणे सीमा भागात आणली जात होती. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांचे जवळजवळ 30 हजार सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

नेपाळची हिंमत वाढतेय; भारताविरोधात उचललं आणखी एक पाऊल

भारताने इतर मार्गांनीही चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. टिकटॉकसह 59 चिनी कंपन्यांच्या अॅपवर भारताने बंदी आणली आहे. तसेच चिनी कंपन्यांच्या भारतातील गुंतवणुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. शिवाय भारताने चीनविरोधात आंतरराष्ट्रीय आघाडी उघडण्याचा प्रयत्न चालवला होता. यामुळे चीनवर सैन्य मागे घेण्यासाठी दबाव वाढत होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत दुरध्वनीवरुन 2 तास चर्चा केली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन्ही सैन्य 2 किलोमीटरपर्यंत मागे हटल्याची माहिती दिली जात आहे.