esakal | Prince Philip भारत दौऱ्यावर आल्यानंतर अडकले होते वादात

बोलून बातमी शोधा

prince philip

प्रिन्स फिलीप यांचा सामाजिक कार्यातही मोठा सहभाग असायचा. त्यांनी वन्यजीव प्राणी, पर्यावरण आणि तरुणांसाठी कार्य केलं आहे.

Prince Philip भारत दौऱ्यावर आल्यानंतर अडकले होते वादात
sakal_logo
By
टीम ई सकाळ

लंडन - ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितिय यांचे पती ड्युक ऑफ एडिनबरा याचं निधन झालं.  विंडसर कॅसल येथील शाही पॅलेसमध्येच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. याआधी आजारपणामुळे फिलीप यांच्यावर महिनाभर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सोळा मार्च रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. फिलीप हे ड्यूक ऑफ एडिनबरो म्हणून देखील ओळखले जात असत. प्रिन्स फिलीप यांनी महाराणींना खंबीर अशी साथ अखेरपर्यंत दिली. त्यासोबतच प्रिन्स फिलीप यांचा सामाजिक कार्यातही मोठा सहभाग असायचा. त्यांनी वन्यजीव प्राणी, पर्यावरण आणि तरुणांसाठी कार्य केलं आहे.

दुसऱ्या महायुद्धात कामगिरी
प्रिन्स फिलीप यांनी नेव्हल कॉलेजमध्ये त्यांच्यातली चुणूक दाखवली. 1940 मध्ये ते उत्तीर्ण झाले. दरम्यान, दुसरं महायुद्ध सुरु झाल्यानंतर ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये ते दाखल झाले. भूमध्य सागरातील एचएमएस व्हॅलियंट युद्धनौकेवर त्यांची नियुक्ती झाली. तिथं त्यांनी एक मोहिमही यशस्वीपणे पार पाडली. १९४२ मध्ये फर्स्ट लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळाली. नेव्हीतल्या सर्वात तरुण फर्स्ट लेफ्टनंटपैकी एक प्रिन्स फिलीप होते.

हे वाचा - बदललेलं आडनावही मुलांना देऊ शकले नाहीत Prince Philip

नौदलातून निवृत्ती
एलिझाबेथ यांच्याशी विवाहानंतर चारच वर्षे प्रिन्स फिलीप यांना नौदलात सेवा करता आली. किंग जॉर्ज सहावा यांची प्रकृती या काळात खालावली. त्यावेळी राजघराण्याची सर्व सूत्रे एलिझाबेथ यांच्याकडे येणार होती. इतकी मोठी जबाबदारी सांभाळताना त्यांना प्रिन्स फिलीप यांच्या आधाराची गरज होती. त्यामुळे प्रिन्स फिलीप यांनी 1951 मध्ये नौदलाच्या सेवेतून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते राष्ट्रकुल देशांच्या दौऱ्यावर गेले. केनियात असतानाच किंग जॉर्ज सहावा यांच्या निधनाचे वृत्त कळाले. ही निधनाची बातमी एलिझाबेथ यांना फिलीप यांनी सांगितली. 

तरुणांसाठी ड्युक ऑफ एडिनबरा पुरस्कार
फिलीप यांनी समाजकार्यही मोठ्या प्रमाणावर केलं. त्यांनी जगातील तरुणांसाठी 1956 ला एका पुरस्काराची घोषणा केली. यामुळे 15 ते 25 वयाच्या तरुणांना मैदानी खेळात भाग घेण्याची आणि त्यांच्यातले कलागुण विकसित करण्यासाठी मदत झाली. यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. 

हे वाचा - ब्रिटनच्या महाराणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिंस फिलीप यांचं निधन

फिलीप, भारत दौरे आणि वाद
फिलीप यांनी राणीबरोबर ते १९५९, १९६१, १९८३ आणि १९९७ या वर्षांत भारत दौरा केला होता. १९६१ च्या भारत दौऱ्यावर असताना त्यांनी जयपूरच्या महाराजांबरोबर एक छायाचित्र काढून घेतले होते. या छायाचित्रात फिलीप यांनी शिकारीत मारलेला आठ फुटी वाघही होता. याच वर्षी फिलीप हे ब्रिटनमधील वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडचे अध्यक्ष बनले होते. अध्यक्षांनीच वाघाची शिकार केल्याने जगभरात त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. त्यांनी मगरीचीही शिकार केली होती, पण वाघाने त्यांना अडचणीत आणले होते. भारताच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे झाली, त्यावेळीही ते राणीसह भारतात आले होते. त्यांनी अमृतसर येथे जालियनवाला बागेला भेट देत हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. मात्र, यावेळीही त्यांनी केलेली टिपण्णी वादग्रस्त ठरली होती. १९१९ मध्ये जनरल डायरच्या आदेशानुसार झालेल्या गोळीबारात दोन हजार हिंदू, शीख आणि मुस्लिम मारले गेले होते आणि त्यांच्या रक्ताचे पाट येथे वहात होते, अशी माहिती त्यांना देण्यात आली. त्यावेळी त्यांनी, ‘ही अतिशयोक्ती वाटते. हे चुकीचे आहे. मी नौदलात डायर यांच्या मुलाबरोबर होतो. इतके सारे कदाचित जखमी झाले असतील,’ असे ते म्हणाले होते. ब्रिटनमध्येही त्यांनी अनेक वेळा वादग्रस्त टिपण्णी केली होती. 

हे वाचा - ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 'ट्रॅफिक लाइट यंत्रणा'

2019 मध्ये अपघातानंतर त्यांनी वाहन चालवणं बंद केलं होतं. वर्षभरात बऱ्याचदा ते आजारीही पडले होते. यंदा फेब्रुवारी महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरु होते. 16 मार्च रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं.