'त्या' दोघांचा काळ बँकेसाठी सर्वांत वाईट : अर्थमंत्री

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

कोलंबिया युनिर्व्हसिटीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्समध्ये बुधवारी (ता.16) अर्थमंत्री सीतारामन यांचे व्याख्यान झाले.

न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका बुधवारी (ता.16) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलेली असताना सीतारामन यांनी सध्याच्या बँकेच्या स्थितीस रघुराम राजन यांच्या कार्यकाळास जबाबदार धरले. कोलंबिया युनिर्व्हसिटीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्समध्ये बुधवारी (ता.16) अर्थमंत्री सीतारामन यांचे व्याख्यान झाले. तेथे त्या बोलत होत्या.

- Vidhan Sabha 2019 : तुम्ही भाषणं खूप ऐकली, आज मी... - राज ठाकरे

सीतारामन म्हणाल्या की, आजच्या घडीला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना संजीवनी देणे, हे माझे पहिले कर्तव्य आहे. अर्थतज्ज्ञ म्हणून रघुराम राजन यांचा मला आदर आहे. राजन यांनी गव्हर्नर पदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेत तेजी होती. त्याच वेळी बँका कर्जासंबंधी अडचणीत आल्या होत्या. त्यांच्याच कार्यकाळातच साटेलोटे करून नेत्यांच्या फोनवरून बेसुमार कर्जवाटप करण्यात आले.

या आर्थिक कोंडीतून बाहेर येण्यासाठी बँका आजही सरकारी निधीवर अवलंबून आहेत. म्हणूनच बँकिंग क्षेत्राची डॉ. मनमोहन सिंग आणि रघुराम राजन यांच्या काळाइतकी वाईट अवस्था आज नाही. अर्थात, त्या वेळी आम्हाला या गोष्टी ठाऊक नव्हत्या. 

- 'हमारा बजाज' चेतक पुन्हा रस्त्यावर धावणार!

राजन यांनी अलीकडेच ब्राऊन युनिर्व्हसिटी येथे व्याख्यानात मोदी सरकारवर टीका केली होती. पहिल्या कार्यकाळात मोदी सरकारची अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर कामगिरी चांगली नव्हती. या कारणामुळे निर्णय घेण्यासाठी नेतृत्वावर अवलंबून राहावे लागत होते. त्याचबरोबर नेतृत्वाकडे आर्थिक वृद्धीसाठी हवा असलेला सातत्यपूर्ण, तर्कसंगत दृष्टिकोनचा अभाव होता, असे राजन यांनी म्हटले होते. 

- आता लवकरच होणार भारत-पाक सामना; बघा ICCचा प्लॅन

दरम्यान, सोमवारी (ता.14) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी आर्थिक मंदीवर भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, आर्थिक मंदीला मोदीच जबाबदार आहेत. नवीन धोरण तयार करण्यास मोदी सरकारची इच्छाशक्ती नाही. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांचे फायनान्शियल मॉडेल मोदी सरकारने अभ्यासावे. आणि समाजवादावर टीका करण्यापेक्षा अर्थव्यवस्था सुधारण्याकडे लक्ष द्यावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finance Minister Nirmala Sitharaman spoke about Former PM Manmohan Singh and Former RBI Governor Raghuram Rajan