मायकल जॅक्सन आणि जेम्स ब्राऊननंतर फ्लॉइड तिसरा, सोन्याच्या शवपेटीची इतकी आहे किंमत 

floyd buried golden plat casket
floyd buried golden plat casket

ह्युस्टन, ता. 10 : वर्णभेद हद्दपार करण्याचा संकल्प सिद्धीस नेण्याचा निर्धार करीत शेकडो शोकाकुल नागरिकांनी जॉर्ज फ्लॉइडला निरोप दिला. मातेच्या थडग्याशेजारी त्याचे दफन करण्यात आले, तेव्हा जगभरातील वर्णभेदविरोधी नागरिकांना दुःख अनावर झाले होते. मिनियापोलिसमध्ये 25 मे रोजी एका स्टोअरमध्ये नकली नोट दिल्याच्या कारणावरून फ्लॉइडला पोलिसांनी पकडले. डेरेक शॉविन या अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर गुडघ्याने जोर दिला. "मला श्‍वास घेता येत नाही,' असे जॉर्ज कळवळून सांगत असतानाही शॉविनला दया आली नाही. 

ह्युस्टनमधील चर्चमध्ये शोकसभा झाली. त्या वेळी पाचशेहून जास्त नागरिक उपस्थित होते. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कृष्णवर्णीयांच्या "थर्ड वॉर्ड' या वसाहतीत फ्लॉइडचे बालपण गेले. ह्युस्टनसह काही शहरांतील अशा वसाहतीसुद्धा अन्यायाचे प्रतीक ठरल्या आहेत. यासंदर्भात फ्लॉइडचा भाऊ रॉडनी शोकसभेत म्हणाला की, "आता जगातील प्रत्येकाच्या स्मरणात फ्लॉइड राहील. तो जगात बदल घडवणार आहे.' 

परलॅड या उपनगरातील दफनभूमीत शेवटचे एक मैल अंतर फ्लॉइडची सोनेरी शवपेटी अश्‍वरथातून नेण्यात आली. दफनभूमीमध्ये शवपेटी नेण्यात येत असताना बॅंडपथक प्रसंगाला साजेशी कला सादर करीत होते. त्याआधी प्रचंड उकाडा असूनही असंख्य लोकांनी अंत्ययात्रेच्या मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. "या वीराचे नाव घ्या, जॉर्ज फ्लॉइड' अशा घोषणांनी त्यांनी आसमंत दणाणून सोडला होता. 

जॉर्ज फ्लॉइड याचा मृतदेह सोनेरी शवपेटीतून नेण्यात आला. त्यासाठी खास शवपेटी तयार करण्यात आली होती. पॉप संगिताचा सम्राट मायकल जॅक्सन आणि सुप्रसिद्ध गायक जेम्स ब्राऊन यांच्यानंतर सोन्याच्या शवपेटीतून शेवटचा प्रवास करणारा फ्लॉइड हा तिसरा ठरला. मायकल जॅक्सनच्या शवपेटीची किंमत 25 हजार डॉलर इतकी होती. जॉर्जच्या शवपेटीची किंमतही अंदाजे 25 ते 30 हजार डॉलर असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय चलनानुसार शवपेटीची किंमत 18 ते 22 लाख रुपये इतकी होते. जॉर्जच्या अंत्ययात्रेसह त्याच्या कुटुंबाला मदतीसाठी जगभरातून अनेकांना पेसै दान केले आहेत. त्यातूनच हा खर्च करण्यात आला आहे.  

फ्लॉइडचा जन्म झाला ते नॉर्थ कॅरोलायनामधील रेफोर्ड, बालपण गेले ते ह्युस्टन व जेथे नोकरी करीत होता ते मिनियापोलिस अशा तीन शहरांत सहा दिवस दुखवटा व्यक्त करण्यात आला. यापूर्वी अत्याचाराला बळी पडलेल्या एरिक गार्नर, मायकेल ब्राऊन, अहमौद आर्बरी व ट्रेव्हॉन मार्टिन अशा कृष्णवर्णीयांच्या कुटुंबीयांनाही विविध ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली. 

नामवंतांची श्रद्धांजली 
चर्चमध्ये सुमारे चार तास चाललेल्या शोकसभेत ग्रॅमीविजेता गायक नि-यो याने भावपूर्ण गीत सादर केले. अभिनेते जेमी फॉक्‍स, चॅनिंग टॅटम, "एनएफएल'चा फुटबॉलपटू जे. जे. वॅट, रॅप कलाकार ट्राई था ट्रुथ, रिपब्लिकन पक्षाच्या शेईला जॅक्‍सन ली, ह्युस्टनचे पोलिस प्रमुख आर्ट ऍकेवेडो, महापौर सिल्वेस्टर टर्नर अशा नामवंतांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

बायडेन यांचा शोकसंदेश 
आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्या शोकसंदेशाची व्हिडिओ क्‍लिप दाखविण्यात आली. ते आधी फ्लॉइडच्या सहा वर्षांच्या मुलीला भेटले होते. त्यांनी सांगितले की, कुणाही लहान मुलांनी विचारू नयेत, असे अनेक प्रश्‍न तुमच्या मनात आहेत. खास करून अनेक कृष्णवर्णीय मुलांना हे प्रश्‍न पिढ्यानपिढ्या विचारणे भाग पडले आहे. का? माझे डॅडी का गेले? आता वर्णभेदाविरुद्ध न्याय देण्याची वेळ आली आहे. आपली मुले "का', असा प्रश्‍न विचारतील तेव्हा आपल्याला हेच उत्तर द्यावे लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com