
मॅक्रोन यांनी या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं की फ्रान्स कोणत्याही प्रकारे झुकणार नाहीये.
पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रोन यांनी शनिवारी म्हटलं की जे मुस्लिम प्रषित मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्रामुळे त्रस्त आहेत, त्यांचा सन्मान करतो परंतु, या आधारावर हिंसेला बरोबर ठरवलं जाऊ शकत नाही. फ्रान्समध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पॅरिसमध्ये एका शिक्षकाच्या शिरच्छेदानंतर नीस शहरातील एका चर्चमध्ये आणखी तीन लोकांची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर शनिवारी लियोनमध्ये एका पादरीला गोळी मारण्यात आली आहे.
काय आहे पार्श्वभूमी?
2015 साली मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याबद्दल फ्रान्समधील शार्ली एब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता ज्यात अनेक व्यंगचित्रकार मारले गेले होते. जगभर या कृत्याचा निषेध नोंदवण्यात आला होता. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपूर्वी फ्रान्समधील एका शिक्षकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर वर्गात चर्चा करताना ही काही व्यंगचित्रे आपल्या विद्यार्थ्यांना दाखवली होती, ज्यामुळे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यामळे व्यंगचित्र आणि फ्रान्समधील दहशतवादी हल्ले हा प्रकार पुन्हा एकदा वर आला आहे.
हेही वाचा - us election: बायडन, हॅरिस जिंकले तर ...
फ्रान्समध्ये दुप्पट सैनिक तैनात
मॅक्रोन यांनी देशातील तैनात सैनिकांची संख्या दुप्पट केली आहे. खासकरुन शाळा आणि प्रार्थनास्थळांजवळ सैनिकांना तैनात केलं गेलं आहे. सोबतच इस्लामिक कट्टरपंथीयांकडून हल्ल्याची सूचनादेखील देण्यात आली आहे. मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्रावरुन सुरु झालेल्या वादानंतर जगभरातील मुस्लिमांनी फ्रान्सविरोधात आगपाखड केली आहे. खासकरुन इस्लामी राष्ट्रांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांना निशाणा बनवलं आहे. याबाबत त्यांनी अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला मुलाखत देऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटलं की फ्रान्सच्या उद्देशांना चुकीच्या पद्धतीने घेतलं जात आहे.
फ्रान्स झुकणार नाही
मॅक्रोन यांनी या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं की फ्रान्स कोणत्याही प्रकारे झुकणार नाहीये. कोणत्याही प्रकारच्या हिंसेसमोर फ्रान्स माघार घेणार नाही. तो नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षणच करेल. आणि यामध्ये व्यंगचित्र प्रसिद्ध करणे हे देखील आहे. मात्र, त्यांनी हे स्पष्ट केलं याचा अर्थ असा नाहीये की, ते अथवा त्यांचे अधिकारी या व्यंगचित्राचे समर्थन करताहेत. आम्ही फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहोत. मुस्लिम ज्याला ईशनिंदा समजतात त्या व्यंगचित्राचे आम्ही समर्थक नाही, तसेच फ्रान्स हे राष्ट्र काही मुस्लिम विरोधी नाहीये, हेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - 'रहस्यमयी' पत्नीला सांगितल्याशिवाय इम्रान खान करत नाही कोणतंही काम!
हिंसा कदापी मान्य नाही
मॅक्रोन यांनी म्हटलं की, मी मुस्लिम लोकांच्या भावना समजू शकतो, तसेच मी त्यांचा सन्मानही करतो. मात्र, मी या गोष्टीला कधीही समर्थन देणार नाही की त्यांना हिंसा करण्याचा अधिकार आहे. मी माझ्या देशातील लिहण्याचे, विचार करण्याचे आणि ते विविध माध्यमातून मांडण्याच्या अधिकाराचे रक्षण करेन. माझी भुमिका देशातील अशांतीला शांत करण्याची आहे, जे मी करत आहे. मात्र, मला लोकांच्या या अधिकारांचे रक्षण देखील करायचे आहे.