श्रीलंकेची सूत्रे आता गोताबाया राजपक्षेंकडे

पीटीआय
Sunday, 17 November 2019

- अध्यक्षीय निवडणुकीत सहज विजय

- सत्ता पुन्हा कुटुंबाकडेच 

कोलंबो : श्रीलंकेत झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी संरक्षण सचिव आणि पीपल्स फ्रंट पार्टीचे उमेदवार गोताबाया राजपक्षे यांनी विजय मिळविला आहे. राजपक्षे यांनी त्यांचे प्रमुख विरोधक आणि युनायटेड नॅशनल पार्टीचे उमेदवार संजीथ प्रेमदासा यांच्यावर 13 लाख मतांनी विजय मिळविला. त्यांच्या या विजयामुळे श्रीलंकेची सूत्रे चार वर्षांनंतर पुन्हा राजपक्षे कुटुंबाकडे आली आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अध्यक्षीय निवडणुकीचे अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रमुख प्रतिस्पर्धी संजीथ प्रेमदासा यांनी पराभव मान्य केला होता. गोताबाया राजपक्षे (वय 70) हे देशाचे माजी संरक्षण सचिव होते. देशाचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे ते मोठे बंधू आहेत. राजपक्षे यांचा चीनकडे अधिक ओढा आहे. त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारातही चीनबरोबरील संबंध अधिक दृढ करण्याचे प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले होते.

श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया नेमके आहेत तरी कोण?

विजय दृष्टिपथात असल्याने राजपक्षे यांनी आनंद व्यक्त करतानाच आपल्या समर्थकांना शांततेने आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत निवडीनंतर राजपक्षे हे विद्यमान अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारतील. 

श्रीलंका अध्यक्षपद निवडणूक; दीड कोटी नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

अध्यक्षीय निवडणुकीसाठी काल (ता. 16) मतदान झाल्यानंतर रात्रीपासूनच मतमोजणीस सुरवात झाली. मात्र, पहिल्या टप्प्यापासूनच राजपक्षे यांनी चांगली आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. राजपक्षे यांना 52.25 टक्के मते मिळाली, तर प्रेमदासा यांना 41.99 टक्के मते मिळाली. प्रेमदासा यांनी आज ट्‌विटरवरून पराभव मान्य करत राजपक्षे यांचे अभिनंदन केले.

मराठी अस्मितेचा हुंकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे : शरद पवार

तसेच त्यांनी पक्षातील उपाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. प्रेमदासा हे भारताला अनुकूल असलेले नेते आहेत. राजपक्षे यांना सिंहलीबहुल जिल्ह्यामध्ये मताधिक्‍य मिळाले, तर तमिळबहुल भागात प्रेमदासा यांना चांगली मते मिळाली. ईस्टरच्या दिवशी झालेल्या बॉंबस्फोटानंतर देशासमोर निर्माण झालेले सुरक्षेचे आव्हान दूर करण्याचे लक्ष्य राजपक्षे यांच्यासमोर असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gotabaya Rajapaksa storms to victory in Sri Lanka presidential polls