esakal | Hybrid Warfare - भारतीय नेत्यांवर चीनची करडी नजर; शस्त्रांशिवाय युद्ध जिंकण्याची रणनिती
sakal

बोलून बातमी शोधा

india china hybrid warfare

 भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश यांच्यासह 10 हजार लोक आणि संघटनांवर चीनकडून नजर ठेवली जात आहे. यामध्ये चिनी कंपनी झेन्हुआ डाटा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडचा वापर केला जात होता.

Hybrid Warfare - भारतीय नेत्यांवर चीनची करडी नजर; शस्त्रांशिवाय युद्ध जिंकण्याची रणनिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बिजिंग - भारत चीन यांच्यात लडाख सीमेवरून वाद सुरू आहे. दरम्यान, सीमेवर कुरापती सुरु असतानाच चीनने वेगळीच घुसखोरी केली आहे. ज्या पद्धतीने रशियानं क्रीमियावर ताबा मिळवण्यासाठी चाल रचली. तशीच आता चीनकडून हालचाल केली जात आहे. भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश यांच्यासह 10 हजार लोक आणि संघटनांवर चीनकडून नजर ठेवली जात आहे. यामध्ये चिनी कंपनी झेन्हुआ डाटा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडचा वापर केला जात होता. बिग डेटाच्या मदतीने भारताविरुद्ध हायब्रिड वॉरफेअर चीनने सुरु केलं आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 

चीनची कंपनी राजकारण, सरकार, व्यवसाय, टेक्नॉलॉजी, माध्यमे यांना त्यांच्या निशाण्यावर घेते. कंपनीचा असाही दावा आहे की, चीनची गुप्तचर संस्था, लष्कर आणि सुरक्षा संस्थेसोबत मिळून काम करते. ही चिनी कंपनी डिजिटल जगतात त्यांच्या लक्ष्यावर करडी नजर ठेवते. यासाठी ते एक डेटाबेस तयार करतात. ज्यामध्ये कंटेटला फक्त न्यूज सोर्स, फोरम या स्वरुपात नाही तर कागदपत्रे, पेटंट याशिवाय विविध पदांची भरती याबाबतची माहिती ठेवली जाते. 

हे वाचा - धक्कादायक! पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती,सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते, राज्यांचे मुख्यमंत्री ...यांच्यावर चीनची नजर

दिग्गज लोकांवर करडी नजर
लोकांची, संस्थांची आणि माहितीशी संबंधित रेकॉर्डचा डेटाबेस तयार केला जातो. यामागचा उद्देश हाच आहे की, लोकांच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज घेणं हा आहे. चिनी कंपनी सोशल मीडियावर त्यांना ज्या लोकांवर नजर ठेवायची आहे त्यांच्या कोणत्या पोस्टवर फॉलोअर्स काय कमेंट करतात? किती लाइक आहे याचे विश्लेषण करते. याशिवाय संबंधित लोकांच्या हालचालीवरही नजर ठेवते. त्यांचा ठावठिकाणा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने शोधला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डेटा एकत्र करण्यामागे नक्कीच मोठा कट शिजत असणार आहे. हायब्रिड वॉरफेअरमध्ये चिनी कंपनी आघाडीवर आहे. 

हायब्रिड वॉरफेअर काय आहे?
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने 1999 च्या सुरुवातील हायब्रिड वॉरफेअर साठी एक रणनिती आखली. याअंतर्गंत हिंसाचार ही बाब लष्करापासून नेते, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या दुनियेमध्ये आणायाची होती. या नव्या युद्धाचे मास्टरमाइंड चीनचे कर्नल कीआओ लिआंग आणि कर्नल वांग शिआंगसूई हे होते. हायब्रिड वॉरफेअरच्या माध्यमातून चीन शत्रू राष्ट्रात समाजात तेढ निर्माण करणं, आर्थिक विकासात अडथळा निर्माण करणं, संस्थांची लूट करणं, राजकीय नेतृत्व आणि त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून प्रतिमा खराब करणं या गोष्टी केल्या जात आहेत. अशाच प्रकारे रशिया क्रीमियामध्ये हायब्रिड वॉरफेअरचा वापर करत आहे. मात्र चिनच्या तुलनेत रशिया कमी प्रमाणात या बाबी करत आहे. चीनने हाँगकाँगमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.

हे वाचा - कोरोना लढाईत अप्रतिम काम केल्याबद्दल मोदींनी माझं कौतुक केलं- डोनाल्ड ट्रम्प

अॅप बंदीने फारसा परिणाम नाही
भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव सुरु झाल्यानंतर भारताने 100 हून अधिक चिनी अॅपवर बंदी घातली. मात्र यामुळे झेन्हुआ सारख्या कंपनीच्या कामात काहीच अडचण येणार नाही. चीनचा उद्देश शत्रू राष्ट्रावर कोणत्याही शस्त्रांशिवाय प्रभाव टाकणं आणि त्यांना नुकसान पोहोचवणं हा आहे. चीनच्या रणनितीनुसार शत्रूराष्ट्रातील वातावरण बिघडवणं, अजेंड्याच्या माध्यमातून शत्रूला पराभूत करणं हाच त्यांचा उद्देश आहे.