
Indian Rupee: भारतीय रुपयाचा दबदबा, रशियानंतर आता 'या' देशासोबत करणार रुपयात व्यवहार
Indian Rupee: भारत आणि मलेशिया आता इतर चलनांसह भारतीय रुपयामध्ये व्यापार करू शकणार आहेत. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतीय चलनात परकीय व्यापार करण्याला मान्यता दिली होती.
परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि मलेशियामधील व्यापार आता इतर चलनांसह भारतीय रुपयातही होऊ शकतो. मंत्रालयाने सांगितले की आरबीआयच्या पुढाकाराचा उद्देश व्यापार वाढ सुलभ करणे आणि भारतीय जागतिक व्यापाराचे समर्थन करणे आहे. (India, Malaysia can now trade in Indian rupee)
व्होस्ट्रो खात्यातून व्यवसाय केला जाईल :
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, क्वालालंपूरस्थित इंडिया इंटरनॅशनल बँक ऑफ मलेशिया (IIBM) ने आपल्या बँकिंग सहयोगी युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) मार्फत विशेष रुपी व्होस्ट्रो खाते उघडून ही प्रणाली भारतात लागू केली आहे. व्होस्ट्रो खाती भारतीय रुपयांमध्ये पेमेंट करण्यासाठी वापरली जातात.
युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध लादले, त्यानंतर भारताने रुपयात परकीय व्यापाराला चालना देण्यास सुरुवात केली. जुलै 2022 मध्ये आरबीआयने याबाबत मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली होती.
डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, निर्यातीला चालना देण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यासाठी तसेच परकीय चलनाच्या साठ्यावरील भार कमी करण्यासाठी RBI ने जागतिक व्यापार करार प्रस्तावित केला होता.
या उपक्रमाचा उद्देश जागतिक व्यापार आणि जागतिक व्यापारी समुदायाला प्रोत्साहन देणे आणि सुविधा देणे हा आहे.
मलेशियाला भारताच्या निर्यातीतील प्रमुख वस्तू म्हणजे खनिज इंधन आणि खनिज तेल. याशिवाय अॅल्युमिनियम व त्यापासून बनविलेल्या वस्तू, मांस, लोखंड व पोलाद, तांबे व त्यापासून बनविलेल्या वस्तू, सेंद्रिय रसायने, अणुभट्ट्या, यंत्रसामग्री व यांत्रिक उपकरणे इत्यादींची निर्यात केली जाते.
याशिवाय मलेशियातून भारतात येणाऱ्या प्रमुख वस्तू म्हणजे पाम तेल, खनिज इंधन, खनिज तेल, विद्युत यंत्रसामग्री आणि उपकरणे या वस्तूंचा समावेश आहे.