भारतीय शिष्टाईचे पाऊल पडते पुढे..; जगभरातील अनेक देशांना भारताशी जवळीक साधण्याची भासू लागली गरज!

Indian Diplomacy : गेली काही वर्षे तणावपूर्ण संबंध असलेला युरोपीय महासंघही भारतानजीक आला आहे. भारत व चीन (India and China) राजदूतीय संबंध प्रस्थापित झाल्यास यंदा 75 वर्ष पूर्ण झाली.
India and China
India and Chinaesakal
Updated on

Indian Diplomacy : भारतीय शिष्टाई गतीमान झालीय. दिवसेंदिवस तिचं पाऊल पुढे पडतंय, असं गेल्या काही महिन्यातील घडामोडी पाहता दिसून येते. वर्तमान काळाची ही गरज असावी. दक्षिण पूर्व प्रशांत महासागरातील न्यूझीलँडपासून ते दक्षिण धृवाच्या मार्गावरील तब्बल सहा हजार कि.मीचा प्रशांत महासागराचा किनारा लाभलेल्या चिलीपर्यंत भारतीय शिष्टाईने संपर्क साधला आहे. किंबहुना, या परिसरातील अनेक देशांना भारताशी जवळीक साधण्याची गरज भासू लागली आहे.

गेली काही वर्षे तणावपूर्ण संबंध असलेला युरोपीय महासंघही भारतानजीक आला आहे. भारत व चीन (India and China) राजदूतीय संबंध प्रस्थापित झाल्यास यंदा 75 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने गलवानच्या चकमकीनंतर थंड पडलेल्या दुतर्फा शिष्टाईनं पुन्हा एकदा उचल घेतलीय. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर वैश्विकरणाची जी उलथापालथ होत आहे, त्या अस्थिर स्थितीतही अमेरिका, रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन बरोबर भारताचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत. भारताचा बहुधृवीय धोरणाला पाठिंबा आहे.

India and China
Ajit Pawar NCP : 'हे' चार माजी आमदार हाती बांधणार 'घड्याळ'; मोठ्या प्रयत्नानंतर अजितदादांच्या हाती लागणार मातब्बर चेहरे!

विश्वगुरूचा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे `विश्वबंधू’ होऊ पाहात आहेत, तर महासत्ता म्हणून जाणल्या जाणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वाटचाल `विश्वशत्रू’ होण्याच्या दिशेने चालू आहे. चीन व रशियाच्या विस्तारवादी धोरणाला विरोध करणारे ट्रम्प, अमेरिकेचा विस्तार थेट ग्रीनलँड, पनामा, गाझा, कॅनडा, मेक्सिकोपर्यंत करू पाहात आहेत. त्यांचा हा विचार चीन व रशियालाही मागे टाकतो. प्रत्यक्षात येत्या चार वर्षात त्यांना काय काय साध्य होईल व ते सामोपचाराने होईल, की सैन्यबळाचा वापर करून, हे जगाला लौकरच दिसणार आहे.

अमेरिका व चीनच्या अटीतटीच्या व्यापारयुद्धाचा भारताला मात्र काही प्रमाणात लाभ होणार, हे निश्चित. त्यासाठी भारत काय पावले टाकणार, याकडे जगाचे लक्ष आहे. एकीकडे, भारत व अमेरिका यांचे संबंध चांगले राहावे, यासाठी दोन्ही देशांदरम्यान वेगवेगळ्या स्तरावर चाळीस समित्या (मेकॅनिझम्स) आहेत, तर भारत-चीन दरम्यान तब्बल पन्नास समित्या आहेत. असे असूनही मोदी यांचे `जिगरी’ दोस्त ट्रम्प त्यांना भारताला गृहित धरता येणार नाही. दुसरीकडे, जिनपिंग यांच्याबरोबर सहकार्य साधताना प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावे लागेल. दरम्यान, भारताचे महत्व ओळखून भारताला भेट देणाऱ्या परदेशी व्हीआयपींची संख्या वाढत आहे.

युरोपीय महासंघाच्या अध्य़क्ष उर्सुला व्हॅन देर लियेन यांनी 27-28 फेब्रुवारी रोजी भारताला भेट दिली. त्यावेळी झालेल्या औपचारिक चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व लियेन यांच्यातर्फे जारी करण्यात आलेल्या 13 बिंदूंच्या संयुक्त निवेदनात महासंघाबरोबरचे संबंध व्युहात्मक पातळीवर नेण्याचे ठरले. महासंघातील सदस्य देशांची संख्या 27 आहे. यातील प्रत्येक देशाबरोबर दुतर्फा पातळीवर भारताचे स्वतंत्र संबंध आहेत. 2023 मध्ये भारत व महासंघाबरोबरच्या व्यापाराचे प्रमाण 124 अब्ज ( 2023 मध्ये भारताच्या एकूण व्यापाराच्या 12.2 टक्के) युरो होते.

अमेरिकेखालोखाल महासंघाचा दुसरा क्रमांक लागतो. भारत व अमेरिका दरम्यान व्यापाराचे प्रमाण 131.84 अब्ज डॉलर्स आहे. भारत व महासंघ यांच्या दरम्यान गेली दहा ते पंधरा वर्षे असलेला तणाव संपुष्टात आला असून, ट्रम्प यांनी महासंघाला धमक्या देण्यास सुरूवात केल्याने संघ अमेरिकेपासून दूर गेला, हे ही संघाचे भारताशी संबंध वाढण्याचे एक कारण होय. हवामान बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता, दहशतवाद, विकासीकृत अर्थव्यवस्था, हरित परिवर्तन, उर्जा, संकटकालीन व्यवस्थापन आदी क्षेत्रात सहकार्य करीत व्यापारातील सर्व अडथळे यांना दूर करून खुला व्यापार प्रस्थापित करणे, यावर भारत व महासंघाने भर दिला. हिंद-प्रशांत महासागर योजनेत सहभाग घेण्याच्या महासंघाने दाखविलेल्या तयारीचे भारताने व भारताने महासंघाच्या पेस्को (पर्मनन्ट स्ट्रक्चर्ड कोऑपरेशन) योजनेत भाग घेण्याचे ठरविले, याचे महासंघाने स्वागत केले.

`नाटो’ संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. त्यामुळे, ``स्वरक्षणासाठी महासंघाचे स्वतंत्र सैन्य हवे,’’ असे काही दिवसापूर्वी लियेन म्हणाल्या होत्या. हे ध्यानात घेता महासंघ व भारत दरम्यान सुरक्षेच्या संदर्भातही समझोते होण्याची शक्यता आहे. मध्य आशियातील संघर्ष व युक्रेनधील युद्धाच्या संदर्भात मोदी व लियेन यांची चर्चा झाली. वर्षाअखेर मुक्त व्यापार करारावर शिक्का मोर्तब करण्याचे ठरले. महासंघातील देशांच्या तब्बल 4500 कंपन्या भारतात असून, त्यात 17 लाख 70 हजार प्रत्यक्ष व 50 लाख रोजगारांची अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली आहे. महासंघाने भारतात 5.1 लाख युरोंची गुंतवणूक केली आहे.

डिसेंबर 2024 पासून विदेशातील निरनिराळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, वैचारिक गटातील (थिंक टँक) तज्ञ यांची दिल्लीला भेट देण्याची रीघ वाढली आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिस्सानायके यांनी डिसेंबर 2024 च्या दुसऱ्या पंधरवड्यात भारताला भेट दिली. गेल्या काही वर्षात दोन्ही देशांचे संबंध यथातथाच होते. त्या वर्षात चीनने तेथे बरेच पाय रोवले. पाकिस्तानमधील ग्वादार सारखे श्रीलंकेतील हम्बनटोटा बंदर पूर्णपणे चीनच्या प्रभावाखाली आले, याचे कारण चीनने त्यात केलेली प्रचंड गुंतवणूक. तथापि, मोदी यांच्या एप्रिलमधील श्रीलंका भेटीमध्ये माओ-ओमंथाय रेल्वमार्ग बांधण्यासाठी दोन्ही देशात झालेला समझोता व त्रिकोमाली बंदराच्या विकासासाठी भारताबरोबर झालेला समझोता संबंध लाक्षणिकदृष्ट्या सुधारल्याचे द्योतक होय.

दिस्सानायके यांनीही अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेबरात पहिली भेट भारताला दिली होती. मोदी यांच्या दौऱ्यात त्यांना श्रीलंकेने `मित्र विभूषण’ हा किताब बहाल केला होता. दोन्ही देशात संरक्षण व उर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला. दक्षिण अमेरिकेतील चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांच्या एप्रिलमधील दिल्ली दौऱ्यात यांच्याबरोबर झालेल्या वाटाघाटीत चिलीतील लिथियम व तांबे यांच्या व्यापाराबाबत झालेली चर्चा भारताच्या फायद्याची ठरेल. डॉ मनमोहन सिंग यांचे सरकार असताना माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 12 ते 25 एप्रिल 2008 दरम्यान ब्राझील, मेक्सिको व चिली या तीन राष्ट्रांना भेटी देऊन दक्षिण अमेरिकेशी संबंध सुधारले होते.

नंतरच्या काळात त्यात बरीच शिथीलता आली होती, ती या भेटीने दूर झाली. ब्राझीलमधल्या साखर उद्योगाचे महाराष्ट्राशी चांगले संबंध आहेत. तसेच, भारतातील वाहतुकक्षेत्राला ब्राझीलमधील इथेनॉल निर्मिती व वापरापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे. बोरिक यांच्या भेटीबरोबरच द नेदरलँडस्चे परराष्ट्र मंत्री कॅस्पर व्हेल्डकाम्प यांच्या भेटीत सेमिकंडक्टर्स, अंकीयतंत्रज्ञान, हरित हैड्रोजन या क्षेत्रात सहकार्य करण्याचे ठरले. येत्या वर्षाअखेर दुतर्फा खुला व्यापार समझोता होईल. ``पाकिस्तानला लष्करी सामग्रीचा पुरवठा करू नका,’’ अशीही विनंती नेदरलँड्सला करण्यात आली.

India and China
Jyotiba Dongar Chaitra Yatra : जोतिबा डोंगरावर उधळण्यात आलेला 'गुलाल' काठावर पास; गुलालामध्ये आढळले केमिकलचे प्रमाण

मार्च 2025 मध्ये न्यूझिलँडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झॉन यांच्या दिल्लीभेटीत येत्या दोन महिन्यात मुक्त व्यापार करार करण्याचे ठरले. न्यूझिलँडबरोबर सर्वंकश आर्थिक भागीदारी करार करण्याचे, तसेच व्यापाराचे प्रमाण दहा पटींनी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या व्यतिरक्त भूतानचे पंतप्रधान दाशो त्सेरिंग ( 20-21 फेब्रुवारी), कतारचे अमीर शेख तामिम बिन हमाद अल थानी ( 17-18 फेब्रुवारी), सिंगापूरचे अध्यक्ष थरमन शण्मुगरतन्म (14 ते 18 जानेवारी), इन्डोनेशियाचे अध्यक्ष प्रोवोबो सुबियांतो (23-26 जानेवारी), तसेच, 2024 मध्ये ग्रीस, फ्रान्स, ओमानचे सुलतान, स्पेन, जर्मनीचे चॅन्सेलर, मालदीवचे अध्यक्ष, अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स, व्हिएतनामचे पंतप्रधान, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री यांनी दिलेल्या भेटीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे महत्व वाढताना दिसते.

चीनबरोबर संबध तणावपूर्ण झाल्याने चिंतेत असलेल्या फिलिपीन्सने क्वाडमध्ये (भारत-जपान-अमेरिका-ऑस्ट्रेलिया चतुष्कोन) सदस्यत्व मिळावे, अशी इच्छा नुकतीच व्यक्त केली आहे. फिलीपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्या वतीने दिल्लीत अलीकडे झालेल्या रायसीना डायलॉगमध्ये बोलताना जनरल रोमेओ ब्राउनर यांनी सांगितले, की चीनने दक्षिण चीनी समुद्रातील मिसचिफ रिफ बेटावर 2.7 कि.मी ची धावपट्टी बांधली आहे. त्याचा वापर लढाऊ विमानांसाठी व क्षेपणास्त्र तैनात करण्यासाठी होणार असल्याने दक्षिण चीनी समुद्रावर चीनचे पूर्ण नियंत्रण होईल. त्याचा धोका फिलिपीन्स सह त्या परिसरातील सर्व देशांना असेल.

India and China
Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटात आढळला 17 व्या शतकातील देवनागरी लिपीतील शिलालेख; शिळेवर काय लिहिलाय मजकूर?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक जकात धोरणाचा सामना करण्यासाठी भारताने मार्च महिन्यात अनेक देशांबरोबर बोलणी सुरू केलीत. त्यात क्यूबा, इजिप्त, ओमान, पेरू, चिली, श्रीलंका, न्यूझिलँड, मलेशिया, स्वीडन, नॉर्वे, हंगेरी, ग्वाटेमाला, स्लोव्हाकिया व बेल्जियम यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मुक्त व्यापार समझोते करण्यासाठी भारत ब्रिटन, युरोपीय महासंघ, ओमान, पेरू व श्रीलंका यांच्याबरोबर वाटाघाटी करीत आहे.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी व्हान्स यांचा सहकुटुंब भारत दौरा व मोदी यांची सौदी अरेबिया भेट यातूनही भारतीय शिष्टाईचे पाऊल पुढे पडणार आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांनी 2019 मध्ये भारताला दिलेल्या भेटीत भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले होते. त्याबाबत मोदी चर्चा करतील. चीनच्या `बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाला पर्याय म्हणून `भारत-मध्य आशिया-युरोप-आर्थिक मार्गिका (आयएमइइसी कॉरिडॉर)) प्रकल्प अंमलात आणण्याच्या दृष्टिने विचारविनिमय होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com