वॅक्सिनच्या निर्मितीत भारताची भूमिका महत्वाची, व्हायरस एक्सपर्ट आणि ट्रम्प यांच्या सल्लागारांचे मत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

कोरोनावर लस शोधण्यासाठी जगात अनेक देशांमध्ये संशोधन सुरु असून भारतही याबाबतीत मागे नाही. भारतातही अनेक कंपन्या लसीवर काम करत आहेत.

वॉशिंग्टन : जगात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कोरोनावर कोणतीही लस नसल्यामुळे जगभरात कोरोनाचे रुग्ण एका दिवसाला लाखोंनी वाढत आहेत. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगात अनेक देशांमध्ये संशोधन सुरु असून भारतही याबाबतीत मागे नाही. भारतातही अनेक कंपन्या लसीवर काम करत आहेत. अशातच अमेरिकेतील प्रसिद्ध व्हायरस तज्ज्ञ अँथनी फौची यांनी भारतातील या संशोधनाची स्तुती केली आहे. तसेच भारताची लस तयार झाल्यावर भारत ही लस जगाला मोठ्या प्रमाणात पुरवू शकतो, असं  फौची  ICMR( इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ) च्या पत्रकार परिषदेत म्हणाले. भारतात भविष्यात लसीची निर्मिती ही दिलासादायक असणार असून याचा फायदा जगातील अनेक देशांना होणार आहे. त्यामुळेच वॅक्सिनच्या निर्मितीत भारताची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचं  मत फौची यांनी व्यक्त केलं. अँथनी फौची हे सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत.

जगात अनेक कंपन्या करोनाच्या  लसीवर काम करत आहेत. त्या कंपन्यांसोबत जगातील बऱ्याच देशांनी करार केले आहेत. त्यामध्ये अमेरिकेने ६ कंपन्यांसोबत अब्जावधी रुपयांचे करार केले आहेत. असेच करार जपान आणि युरोपियन युनियननेही केले आहेत. 

हे वाचा - मोदी अयोध्येत सर्वात आधी करणार हनुमानाची पूजा; जाणून घ्या कारण

ऑक्‍सफर्ड यूनिवर्सिटी आणि अस्‍त्राजेनेका यांनी बनवलेल्या लसींची माकडांवर केलेली चाचणी यशस्वी झाली आहे. तसेच अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचीही करोनावरील लसीची चाचणी यशस्वी झाल्याचं समोर आलं आहे. आता या कंपन्यांनी  तयार केलेल्या लसींची मानवी चाचणी सुरु केली आहे. सध्या ऑक्‍सफर्डची लस मानवी चाचणीत तिसऱ्या फेजमध्ये असून जॉन्सन अँड जॉन्सनची लस पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये आहेत. तसेच मॉडर्ना या कंपनीच्या लसीचीही माकडांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे आता जगात माकडांवर यशस्वी चाचणी झालेल्या चार लसी आहेत. दुसरीकडे  रशियानेही  करोनावरील लस लवकरच येईल असा दावा केला आहे. भारतातील परिस्थिती पहिली असता, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला अस्‍त्राजेनेकाच्या लसींच्या फेज २ आणि ३ च्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी दिली आहे.

हे वाचा - कोरोनाने हज यात्रेचं चित्रच बदलून टाकलं, पाहा PHOTO

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगात १६५ कंपन्या करोनावरील लसीबाबत संशोधन करत आहेत. ही माहिती WHO कडे नोंदणी झालेल्या कंपन्यांची आहे. बऱ्याच कंपन्यांनी नोंदणी केली नसल्यामुळे हा आकडा वाढू शकतो. ज्या कंपन्यांनी नोंदणी केली आहे त्यांच्या लसींची सध्यस्थिती कमीत कमी प्री क्लीनिकल ट्रायल फेजपर्यंत पोहचली आहे. काही कंपन्या तर चाचणीच्या शेवटच्या फेजपर्यंत पोहचल्या आहेत तर काही कंपन्या त्यांच्या लसीची चाचणी प्राण्यांवरही करत आहेत.

भारतातील अनेक कंपन्यांसोबत लसीबाबत चर्चा सुरु असल्याचं 'ग्लोबल अलायंस फॉर वैक्सीन ऐंड इम्यिनुजाइशन' (GAVI)चे कार्यकारी प्रमुख सेथ बार्कले  यांनी सांगितलं आहे. तसेच WHO च्या चीफ साइंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी भारत जर कोवॅक्ससोबत आला भारताला लसीबाबत जगातील कंपन्यांसोबत वेगळा करार करावा लागणार नाही असं म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india will important role covid vaccine production say virus expert anthony fauci