अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या माला अडिगांची 'बायडेन टीम'मध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

अमेरिकेच्या राजकारणात आणि प्रशासनात भारतीय वंशाचे अनेक लोक कार्यरत आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेत भारतातील जवळपास 40 लाख लोक राहतात. आपल्या उत्तुंग अशा कामगिरीने अनेकांनी आपली चमक दाखवली आहे. अमेरिकेच्या राजकारणात आणि प्रशासनात भारतीय वंशाचे अनेक लोक कार्यरत आहेत. इतकंच नव्हे, तर आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदीच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस असणार आहेत. ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब निश्चितच आहे. मात्र, आता आणखी एका भारतीय वंशाच्या महिलेची मोठ्या पदावर वरणी लागली आहे. जो बायडेन यांनी आणखी एका भारतीय-अमेरिकन व्यक्तीला आपल्या टीममध्ये एक महत्त्वाचे स्थान दिले आहे.

हेही वाचा - ‘रेमेडिसिव्हीर’ प्रभावी ठरत असल्याचा पुरावा नाही; शिफारस न करण्याचा WHO चा निर्णय

जो बायडेन यांनी आपल्या पत्नीसाठी म्हणजेच जिल बायडेन यांच्यासाठी भारतीय-अमेरिकन वंशाच्या माला अडिगा यांना 'पॉलिसी डायरेक्टर' या  पदावर नियुक्त केलं आहे. जिल बायडेन या आता अमेरिकेच्या 'फर्स्ट लेडी' असणार आहेत. 
2008 मध्येही माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अभियानात देखील माला अडिगा यांनी काम केलं आहे. 

अडिगा यांनी जिल यांच्या एक वरिष्ठ सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. तसेच जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या अभियानाच्या एक वरिष्ठ नीती सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. याआधी अडिगा या बायडेन फाऊंडेशनमध्ये उच्च शिक्षण आणि सैन्य परिवारांसाठी डायरेक्टर होत्या. 

हेही वाचा - सत्ता हाती घेताच चीनला नियम पाळायला लावू; बायडेन ट्रम्प यांचाही निर्णय बदलणार

अडिगा यांनी ग्रिनल कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि शिकागो लॉ स्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. सोबतच त्या एक वकिल देखील आहेत. तसेच त्यांनी क्लार्क म्हणून देखील काम पाहिलं आहे. त्यांनी शिकागो लॉ फर्मसाठी काम केलं आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian American Mala Adiga appointed as joe bidens wife Jill Bidens policy director