भारतीयांच्या हाती अमेरिकेची सूत्रे; राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केलं कौतुक

USA_Joe_Biden
USA_Joe_Biden

वॉशिंग्टन : भारतीय अमेरिकी लोक हे आता आपला देश देखील चालवू लागले आहेत, असे सांगतानाच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शुक्रवारी (ता.५) तेथील स्थानिक भारतीयांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी त्यांनी अमेरिकी प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर आज भारतीय अमेरिकी वंशाची मंडळी असल्याचाही दाखला दिला.

बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून अद्याप पन्नास दिवस देखील पूर्ण झालेले नाहीत. त्यांच्या प्रशासनामध्ये ५५ भारतीय अमेरिकी वंशाच्या मंडळींना महत्त्वाच्या पदांवर नेमण्यात आले आहे. यामध्ये अगदी बायडेन यांच्या स्पीच रायटरपासून ते नासामधील संशोधकापर्यंत सर्वांचाच समावेश आहे. बायडेन यांनी आज नासाच्या मंगळ मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या सर्वच संशोधकांशी व्हर्च्युअल संवाद साधला. यावेळी त्यांनी संशोधक डॉ. स्वाती मोहन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि स्वतःचे स्पीच रायटर विनय रेड्डी यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भारतीय अमेरिकी वंशाच्या संशोधक स्वाती मोहन यांनी नासाच्या मंगळ मोहिमेचे नेतृत्व केले होते.

भारतीयांचा दबदबा
अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून २० जानेवारी सूत्रे स्वीकारल्यानंतर बायडेन यांनी ५५ भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांना अमेरिकी प्रशासनात महत्त्वाच्या पदावर नेमले होते. यामध्ये देखील मोठ्या संख्येने महिलांचा समावेश असून त्या व्हाइट हाउसमध्ये कार्यरत आहेत. याआधीच्या ट्रम्प आणि ओबामा सरकारमध्ये देखील भारतीय वंशाच्या मंडळींचाच दबदबा होता. मागील आठवड्यामध्ये डॉ. विवेक मूर्ती यांची सर्जन जनरल म्हणून नियुक्ती करण्यास सिनेटच्या समितीने मंजुरी दिली होती. वनिता गुप्ता यांची देखील जस्टिस डिपार्टमेंटच्या असोसिएट जनरलपदी म्हणून नियुक्ती होणार आहे.

अमेरिकेच्या सार्वजनिक सेवेतील भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांचे यश नेत्रदीपक आहे. अनेक मंडळींनी येथील राजकारणात दबदबा निर्माण केला आहे. माझा समुदाय दिवसेंदिवस शक्तिशाली होत असल्याचे पाहून अभिमान वाटतो.
- एम. रंगास्वामी, सामाजिक कार्यकर्ते

‘तुम्ही स्वप्नांना जन्म दिला’
नासाचे पर्सिव्हरन्स हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरल्याने अमेरिकेच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. भारतीय अमेरिकी वंशाच्या एअरोस्पेस इंजिनिअर आणि संशोधक डॉ.स्वाती मोहन यांच्याकडे या मोहिमेची धुरा होती. आज बायडेन यांच्याशी संवाद साधताना स्वाती मोहन यांनी त्यांचा संशोधक बनण्याचा प्रवास मांडला. ‘स्टार ट्रेक’ या शोपासून आपल्याला संशोधक बनण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नासाच्या टीमचे देखील कौतुक केले. स्वाती मोहन यांनी संशोधकांशी बोलल्याबद्दल बायडेन यांचे आभार मानले.

यावर बायडेन यांनीही त्यांची फिरकी घेतली. ‘‘मला तुम्ही चिडवत आहात का?’’ असा सवाल त्यांनी केली. तुमच्याशी संवाद साधणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. तुम्ही सगळी मंडळी अफलातून आहात. जेव्हा रोव्हर हे मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले तेव्हा तुम्हाला ते सगळं स्वप्नवत वाटले. पण यामाध्यमातून तुम्ही लाखो मुले, अमेरिकी तरुण यांच्यासाठी एक वेगळे स्वप्न तयार केल्याचे बायडेन म्हणाले.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com