esakal | भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल, कोरोनाबाधिताच्या फुफ्फुसाचे केले प्रत्यारोपण
sakal

बोलून बातमी शोधा

surgery

फुफ्फुसाचे प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाला मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. एका महिन्यात या डॉक्टरसह त्यांच्या पथकाने अशा प्रकारे दुसऱ्यांदा फुफ्फुसाचे प्रत्यारोपण केले आहे.

भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल, कोरोनाबाधिताच्या फुफ्फुसाचे केले प्रत्यारोपण

sakal_logo
By
सूरज यादव

न्यूयॉर्क- जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या या संकटात बाधित रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. अशा परिस्थितीत इतर आजार असलेल्या रुग्णांवर उपचारातही अडथळे आल्याची अनेक उदाहरणं या काळात बघायला मिळाली. मात्र आता भारतीय वंशाच्या एका डॉक्टरने एका रुग्णाच्या दोन्ही फुफ्फुसाच प्रत्यारोपण केले आहे. कोरोनामुळे फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं ते खराब झाले होते. एका महिन्यात या डॉक्टरसह त्यांच्या पथकाने अशा प्रकारे दुसऱ्यांदा फुफ्फुसाचे प्रत्यारोपण केले आहे. इलिनोइस नावाच्या 60 वर्षीय रुग्णावर ही शस्त्रक्रिया झाली होती. हा रुग्ण 100 दिवस ईसीएमओवर होता. यामुळे हृदय आणि फुफ्फुसाचे काम सुरू होते. गेल्याच आठवड्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. 

हे वाचा - कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस दिलेल्या महिलेनं 16 आठवड्यांनी शेअर केला अनुभव

डॉक्टर अंकित भारत असं भारतीय वंशाच्या डॉक्टरांचे नाव आहे. ते म्हणाले की, असा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये अनेक आव्हाने आणि धोके असतात. या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात सोबतच्या सहकारी डॉक्टरांचे योगदान आहे. त्यांचा खूप अभिमान वाटतो. 
फुफ्फुसाचे प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाला मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. डॉक्टर अंकित भारत यांनी सांगितलं की, रुग्ण 100 दिवस ईसीएमओवर होता आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. सर्वसाधारणपणे दोन्ही फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागतो. मात्र कोरोनामुळे खराब झालेल्या फुफ्फुसांवर शस्त्रक्रियेसाठी दहा तास लागले. 

हे वाचा - हाँगकाँगमधून जीव वाचवून अमेरिकेत आलेल्या वैज्ञानिकाचा चीनबाबत धक्कादायक खुलासा 

याआधी डॉक्टर भारत यांच्या नेतृत्वाखाली नॉर्थवेस्टच्या डॉक्टरांनी जून महिन्यात कोरोनाबाधित 20 वर्षीय रुग्णावर शस्त्रक्रिया केली होती. त्याच्या फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णाचे ते पहिले फुफ्फुस प्रत्यारोपण होते. 

जगात गेल्या 24 तासात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात एका दिवसा 2 लाख 28 हजार 102 रुग्णांची नोंद झाली. तर एकट्या अमेरिकेतील 65 हजार 551 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे 1 लाख 34 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझिलला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ब्राझिलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 70 हजारांच्या वर गेली आहे.