सौदीत अडकलेल्या भारतीयांवर भीक मागायची वेळ; केली मदतीची याचना 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

सौदी अरेबियातील 450 भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्याने रस्त्यावर भीक मागून आपले गुजराण करण्याची वेळ आली आहे. 

कोरोना महामारीचा जबरदस्त फटका सर्वच देशांना बसला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांवर विपरित असा परिणाम झालेला असून अनेकांनी आपला रोजगार गमावला आहे. सौदी अरेबियातील 450 भारतीयांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्याने रस्त्यावर भीक मागून आपले गुजराण करण्याची वेळ आली आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या भारतीयांवर भीक मागण्याची वेळ आली आहे, अशा भारतीयांची रवानगी ही तिथल्या प्रशासनाने डिटेन्शन सेंटरमध्ये केली आहे. सौदी अरेबियातील बेरोजगार गमावून बसलेल्या अशा भारतीयांची एकूण अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. 

हेही वाचा - लडाखमध्ये चिनी सैनिक पडले आजारी; फिंगर 4 वरून न्यावे लागतायत रुग्णालयात

नोकरी गमावलेल्या अनेक कामगारांच्या कामाचा परवाना संपल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. हे सर्व कामगार आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि महाराष्ट्रातील देखील आहेत. डिटेन्शन सेंटरमध्ये रवानगी झालेल्या या कामगारांचा एक व्हिडीओ प्रसारित झाला होता. या व्हिडीओत ते म्हणताहेत की, नोकरी गमावल्यामुळे भीक मागण्याची वेळ आली आहे. पण भीक मागणे हाच आमचा गुन्हा ठरला आहे. सौदी प्रशासनातील एका अधिकाऱ्याने त्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन त्यांची ओळख पटवून त्यांना जेद्दा शुमासी डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवले आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अमजद नावाच्या एका भारतीय कामगाराने भारत सरकारला कळकळीचे आवाहन केले आहे. त्यात म्हटलंय की, माझ्या भावाच मृत्यू झाला आहे. आईची परिस्थिती बिकट आहे. मला भारतात परतायचे आहे. मला मदत करा. अमजदने पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी आणि सौदी अरेबियातील भारतीय राजदूत औसाफ सईद यांना पत्र पाठवून सौदीत अडकलेल्या सर्व भारतीयांना मदतीसाठी याचना केली आहे. 

हेही वाचा - रेल्वे 21 सप्टेंबरपासून सोडणार क्लोन ट्रेन्स; प्रवाशांना मिळणार दिलासा

मिळालेल्या माहितीनुसार, डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आलेल्या कामगारांमधील 39 जण उत्तर प्रदेश, 10 जण बिहार, 5 जण तेलंगणा तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील प्रत्येकी 4 जण आहेत. आम्ही कसल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाहीये. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आमच्यावर भीक मागण्याची वेळ आली. कारण सध्या आमच्याकडे कोणतीही नोकरी नाही. इथल्या डिटेन्शन सेंटरमध्ये आम्ही बिकट जीवन जगत आहोत, असं एका कामगारने आपली व्यथा मांडताना सांगितलं. यातील बरेच कामगार हे नैराश्यग्रस्त आहेत. 

चार महिन्यांहून अधिक कालावधीपेक्षा ते हालाखीच्या परिस्थितीत आहेत. पाकिस्तान, इंडोनेशिया, बांग्लादेश आणि श्रीलंकेच्या कामगारांना त्यांच्या देशातील अधिकाऱ्यांनी मदत केली आहे. त्यांना त्यांच्या देशात पाठवण्यातही आले आहे. आम्ही मात्र कोणत्याही मदतीविना इथे अडकून पडलो आहोत, असं त्यापैकी एका कामगाराने सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Worker in Saudi Arabia begging due to loss of job