Iran Plane Crash : अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्‍स देण्यास इराणचा नकार!

वृत्तसंस्था
Wednesday, 8 January 2020

इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर इराणने आज इराकच्या तळावर हल्ला केल्यानंतर हा विमान अपघात झाल्याने त्याविषयी अनेक शंका व्यक्त होत आहेत.

तेहरान : युक्रेन एअरलाइन्सच्या अपघातग्रस्त विमानातील दोन ब्लॅक बॉक्‍स इराणच्या शोध आणि बचाव पथकांना सापडले आहेत. मात्र, या ब्लॅक बॉक्‍स बोइंग कंपनीला इराण देणार नसल्याचे तेहरानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे प्रमुख अली अबेदझादेह यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या ब्लॅक बॉक्‍समधील माहितीचे विश्‍लेषण करण्यासाठी त्या कोणत्या देशांत पाठविल्या जाणार आहेत, हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

- पाणी कमी पडतंय म्हणून ऑस्ट्रेलिया घेणार 10 हजार उंटांचा जीव

तेहरानमधील खोमेनी विमानतळावरून बुधवारी उड्डाण केलेले युक्रेनचे विमान कोसळले. यात विमानातील सर्व 176 प्रवाशांचा मृत्यू झाला. युक्रेन एअरलाइन्सचे 'बोइंग 737' हे विमान तेहरानहून युक्रेनमधील कीव येथे जाणार होते. विमानात 167 प्रवासी आणि नऊ कर्मचारी होते.

दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे युक्रेनच्या इराणमधील दूतावासाने प्रथम म्हटले होते; पण नंतर ते मागे घेण्यात आले. वैमानिकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची शक्‍यता युक्रेनचे उपाध्यक्ष इगोर सॉस्नोव्हस्की यांनी फेटाळली आहे. 

- इराण म्हणतंय, 'आम्ही अमेरिकेचे 80 दहशतवादी ठार केले'

दरम्यान, या अपघातानंतर इराणच्या हवाई हद्दीतून जाण्यास युक्रेनच्या विमानांवर गुरुवारपासून (ता.9) बंदी घालण्यात आली आहे, असे युक्रेनचे पंतप्रधान ओलेस्कि हॉनचॉरुक यांनी जाहीर केले. 

दोन दिवसांपूर्वीच झाली तपासणी 

बोइंग 737 या विमानाची निर्मिती 2016 मध्ये झाली होती. थेट कंपनीकडूनच हे विमान युक्रेन एअरलाइन्सने खरेदी केले होते. त्याची नियमित तांत्रिक तपासणी दोन दिवसांपूर्वीच म्हणजे सोमवारी (ता. 6) झाली होती, अशी माहिती युक्रेन एअरलाइन्सने निवेदनात दिली. 

- Australia Fire : दोन वर्षाच्य़ा चिमुकल्याने स्विकारलं वडिलांचे शौर्य पदक; पाहा फोटो !

अपघातामागे घातपात? 

इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर इराणने आज इराकच्या तळावर हल्ला केल्यानंतर हा विमान अपघात झाल्याने त्याविषयी अनेक शंका व्यक्त होत आहेत. इराणच्या क्षेपणास्त्रांनी हे विमान पाडले असल्याचा माझा संशय आहे. मात्र त्याच्या पुराव्यानुसार काहीतरी आपत्तीजनक घडले असल्याचे लक्षात येते, असे विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ स्टिफन राईट यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iran refuses to handover black boxes of crashed plane